खालिद का शिवाजी' आणि 'जुनं फर्निचर' यांची कान महोत्सवात निवड सातासमुद्रापार मराठी चित्रपटांचा डंका!


20 April 2025
मुंबई ,मराठी चित्रपट सृष्टीसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब – फ्रान्समधील प्रतिष्ठित कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Cannes Film Festival) यंदा चार मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. 'स्थळ', 'स्नो फ्लॉवर', 'खालिद का शिवाजी' आणि 'जुनं फर्निचर' या चित्रपटांनी यंदा महोत्सवात प्रवेश मिळवला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कान चित्रपट महोत्सव यावर्षी १४ ते २२ मे दरम्यान होणार असून, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत २०१६ पासून मराठी चित्रपट महोत्सवात सादर केले जात आहेत. यंदा 'खालिद का शिवाजी' आणि 'जुनं फर्निचर' या चित्रपटांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
'खालिद का शिवाजी' – धर्म, ओळख आणि प्रेरणा यांची सर्जनशील मांडणी
राज मोरे दिग्दर्शित 'खालिद का शिवाजी' हा चित्रपट एक मुस्लिम मुलगा खालिद याच्या भोवती फिरतो. समाजाने त्याला दूर लोटले असतानाही, त्याचे निष्पाप डोळे छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेतात. धार्मिक ओळख, समाजातील भेदभाव आणि प्रेरणादायी नेतृत्वाची झलक या चित्रपटात प्रभावीपणे दाखवली आहे.

'जुनं फर्निचर' – वृद्धत्वाच्या वेदनांची भिडणारी कथा
महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि अभिनीत 'जुनं फर्निचर' हा चित्रपट वृद्धापकाळात मुलांकडून होणाऱ्या उपेक्षेवर भाष्य करतो. भूषण प्रधान, मेधा मांजरेकर, समीर धर्माधिकारी, अनुषा दांडेकर आणि इतर कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडतो.
'स्थळ' आणि 'स्नो फ्लॉवर' यांचीही प्रभावी उपस्थिती

जयंत सोमलकर दिग्दर्शित 'स्थळ' हा ग्रामीण भागातील अरेंज मॅरेज सिस्टिमवर भाष्य करतो, तर गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'स्नो फ्लॉवर' रशिया आणि कोकण या दोन वेगवेगळ्या संस्कृतींमधील कथानक उलगडतो.

या निवडीसाठी महामंडळाने विशेष तज्ज्ञ परीक्षण समिती नेमली होती, ज्यामध्ये आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, इरावती कर्णिक, आणि अपूर्वा शालिग्राम यांचा समावेश होता.



