चेंबूरमध्ये ‘तिरंगा रॅली’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ऑपरेशन सिंदूरमधून भारतीय सैन्याला सलाम, भारत दहशतवादाविरुद्ध आक्रमक लढा देत राहील:राहुल शेवाळे


18 May 2025
मुंबई, पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दिलेल्या करारी प्रत्युत्तराला मानवंदना देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने चेंबूर येथे आयोजित ‘तिरंगा रॅली’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
See video
ही रॅली रविवारी सकाळी 10 वाजता पांजरपोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सुरू झाली. माजी खासदार राहुल रमेश शेवाळे आणि आमदार तुकाराम काते यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक व स्थानिक नागरिकांनी दुचाकी व चारचाकी वाहनांमधून सहभाग घेतला.
रॅलीच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पांजरपोळ, देवनार डेपो, लॅक्मे रोड, पटवर्धन हायस्कूल, बोरबादेवी चौक, आचार्य कॉलेज, सुभाष नगर मार्गे रॅली चेंबूर रेल्वे स्थानक मार्गावरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पोहोचली. येथे डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले व पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलींचा हा भाग होता. चेंबूर व अणुशक्तीनगर परिसरात विभाग क्रमांक 11 च्या वतीने ही रॅली पार पडली.
या प्रसंगी विभागप्रमुख अविनाश राणे, महिला विभागप्रमुख सौ. सुनीता वैती, माजी नगरसेविका सौ. पुष्पा कोळी, सौ. अंजली नाईक, लक्षण कोठारी, दीपक महेश्वरी, कैलास आरवडे, देवेंद्रसिंग राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“देशभरातील नागरिकांचे पाठबळ भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत दहशतवादाविरुद्ध आक्रमक लढा देत राहील,” असा विश्वास माजी खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला.



