देवेन भारती मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त


30 April 2025
मुंबई , वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारती हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी असून सध्या ते मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.
मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार आणि अर्चना त्यागी यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, शेवटी देवेन भारती यांची निवड करण्यात आली. फणसाळकर यांनी 30 जून 2022 रोजी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती.
देवेन भारती यांचा पोलीस विभागातील कारकीर्दीत मोठा अनुभव असून त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा), एटीएस प्रमुख, आणि संयुक्त पोलीस आयुक्त अशा विविध पदांवर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या तपासातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. तसेच जे. डे हत्या प्रकरण, इंडियन मुजाहिद्दीनच्या कारवायांवर कारवाई अशा अनेक उच्च दर्जाच्या प्रकरणांचा तपास त्यांनी केला आहे.
राजकीयदृष्ट्या ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांची बदली MSSC (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ) मध्ये करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात काही तक्रारीही दाखल झाल्या, मात्र चौकशी अहवालात कोणतेही ठोस पुरावे न आढळल्यामुळे त्या आरोपांना शासनाने फेटाळले.
मुंबई पोलिस दलाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होताना देवेन भारती यांच्याकडून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



