*नवीन जन्म / मृत्यू / विवाह प्रमाणपत्र नोंदणी नंतर अवघ्या तीन कार्यालयीन दिवसात उपलब्ध होणार* *बालकाच्या जन्म प्रमाणपत्रात नावाची नोंद करून प्रमाणपत्र अवघ्या ३ कार्यालयीन दिवसात उपलब्ध होणार*
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- 47 minutes ago
- 3 min read

11 August 2026
मुंबई (मिम टाइम्स)बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यालयातील (Ward) नागरी सुविधा केंद्राद्वारे जन्म व मृत्यू नोंदणी (Registration of Birth & Death (RBD)) पोर्टलचा वापर करून जन्म/ मृत्यू नोंदणी व दुरूस्तीचे अर्ज स्वीकारले जात आहेत. या सुविधेनुसार नवीन जन्म / मृत्यू / विवाह प्रमाणपत्र नोंदणी नंतर अवघ्या ३ कार्यालयीन दिवसात उपलब्ध होणार आहे. तसेच जन्म प्रमाणपत्रात बालकाचे नाव समाविष्ट करण्याची सुविधा (जन्म घटनेनंतर 15 वर्ष कालावधीच्या आतल्या) अवघ्या ३ कार्यालयीन दिवसात शक्य होणार आहे. विवाह प्रमाणपत्रातील दुरूस्ती अवघ्या ३ दिवसात करण्यात येणार आहेत. तसेच जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रातील दुरूस्त्या २५ कार्यालयीन दिवसात करण्यात येणार आहेत.
जन्म प्रमाणपत्रात बालकाचे नाव समाविष्ट करणे, बाळाच्या जन्म प्रमाणपत्रातील आई - वडील यांच्या नावात दुरूस्ती, मूळ व तात्पुरता पत्त्यात दुरूस्ती, तारीख चूक दुरूस्ती, लिंग चूक दुरूस्ती आदीसारख्या दुरूस्तीसाठीचे अर्ज करता येणे शक्य झाले आहे. मृत्यू प्रमाणपत्रातील दुरूस्ती, क्यूआर कोडयुक्त प्रमाणपत्रात रूपांतर, विवाह प्रमाणपत्र दुरूस्ती यासारख्या दुरूस्तीचेही अर्ज स्विकारण्यात येत आहेत. जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रातील विविध प्रकारच्या विहित कालावधीत म्हणजे २५ कार्यालयीन दिवसात या प्रमाणपत्रातील दुरूस्त्या करून देण्यात येणार आहेत.
नागरिकांनी या अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी विविध प्रकारच्या अर्ज प्रक्रियेबाबत माहितीपर फलक लावण्यात येत आहेत. नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी अर्ज स्थितीच्या माहितीबाबत 'युनिक आयडी'च्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करता येईल. अर्जासोबतच्या पोचपावतीवर युनिक आयडी नमुद करण्यात आला आहे.
नागरीकांना जन्म आणि मृत्यूच्या प्रमाणपत्रातील दुरूस्तीच्या अनुषंगाने पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज स्विकृतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणीच अर्ज स्थिती जाणून घेता येईल. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेत भर पडणार आहे. या सेवेच्या निमित्ताने व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. अर्ज स्विकृतीची सुविधा अधिक सुलभ आणि सोपी व्हावी, याअनुषंगाने नागरी सुविधा केंद्र परिसरात माहितीपर फलक लावण्याची कार्यवाही तसेच याबाबत नागरिकांना पुरेशा प्रमाणात माहिती व्हावी यासाठी अधिक जनजागृती करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्त वर्मा लवंगारे यांनी दिल्या आहेत.
अर्जांच्या अनुषंगाने सर्व दुरूस्त्या u/s 15 of RBD Act, 1969 आणि सुधारित कायदा २०२३ तसेच संचालक (प्राथमिक) आरोग्य सेवा, पुणे तथा मुख्य निबंधक, जन्म व मृत्यू महाराष्ट्र राज्य यांचे जा.क्र.आसे/मुनिजमु/ कक्ष-८३/परिपत्रक / जन्म-मृत्यू नोंदणी /६८०७-९५३/२६ दिनांक १८/०६/२०२६ या परिपत्रकानुसार करण्यात येतील.
नागरी सुविधा केंद्र (CFC) येथे अर्ज करण्याचे पर्याय
- बाळाच्या जन्म प्रमाणपत्रात दुरूस्तीसाठीची प्रक्रिया
- मृत्यू प्रमाणपत्रात दुरूस्तीसाठीची प्रक्रिया
- जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्राचे नवीन क्यूआर कोड प्रमाणपत्रात रूपांतर करणे
- नवीन जन्म / मृत्यू / विवाह प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे
विविध अर्जांच्या अनुषंगाने कार्यवाहीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अर्जाच्या अनुषंगाने अपेक्षित दुरूस्ती तसेच नवीन कागदपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. प्रमाणित सेवा स्तर करार (standard Service Level Agreement (SLA)) च्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, नागरी नोंदणी प्रणाली (CRS) संकेतस्थळाच्या उपलब्धततेनुसार, इंटरनेटची उपलब्धतता, उपलब्ध लेखी स्वरूपातील दस्तावेजाच्या नोंदी, संबंधित विभागाचा कार्यभार तसेच भारत सरकारमार्फत विकेंद्रीकरणानुसार जुन्या प्रमाणपत्रांसाठीची मंजुरी आदी बाबी नागरिकांनी लक्षात घ्याव्यात. त्यामुळे अर्जासाठीचा प्रमाणित कार्यालयीन कालावधी निश्चित केलेला असला तरीही प्रत्यक्ष उपलब्धततेसाठी वेळ लागू शकतो.
जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन QR-कोडयुक्त प्रमाणपत्रामध्ये रूपांतर करण्याची सुविधा उपलब्ध
जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्राचे नवीन QR-कोडयुक्त प्रमाणपत्रामध्ये रूपांतर करण्याच्या अर्ज स्विकृतीसाठी नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्या दाखल्याची उपलब्धता आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभाग स्तरीय नोंदींमध्ये पडताळणीच्या अधीन राहून 'क्यूआर कोड'युक्त प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येईल. स्थानिक पातळीवर नोंद उपलब्ध / शोधता येण्यासारखी नसेल, तर यास उशीर होऊ शकतो, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. क्यूआर कोडयुक्त प्रमाणपत्र रूपांतर करण्याच्या अर्जासाठी जन्म / मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत उपलब्ध करून द्यावी लागेल. तसेच महानगरपालिकेकडे असणाऱया दस्त एवज नोंद ही आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. साधारणपणे २५ कार्यालयीन दिवसात जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन QR-कोडयुक्त प्रमाणपत्रामध्ये रूपांतर करून प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मानस आहे.



