मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचा ऐतिहासिक विजय
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- 11 minutes ago
- 1 min read

01 July 2026
मुंबई: मुंबई मराठी पत्रकार संघाच्या २०२६-२०२८ या द्वैवार्षिक कार्यकारिणीच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने सलग दुसऱ्यांदा सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळवत इतिहास रचला. मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही परिवर्तन पॅनेलने संपूर्ण कार्यकारिणीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांनी विक्रमी ३६६ मते मिळवत पत्रकार संघाच्या इतिहासातील सर्वाधिक मतांनी विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी विष्णू सोनवणे यांना १०८ मते मिळाली.
उपाध्यक्षपदी स्वाती घोसाळकर (३२४) आणि राजेंद्र हुंजे (२८९) विजयी झाले. या पदासाठी संतोष गायकवाड (१३१), रवींद्र भोजने (१०१) आणि नितीन सोनवणे (५८) यांचा पराभव झाला. कार्यवाहपदी शैलेंद्र शिर्के (२७०) विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी मंगेश वरवडेकर यांना १०८, तर दीपक परब यांना ९७ मते मिळाली. कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड (३३५) यांनी कुलदीप घायवट (१३६) यांचा पराभव केला. विश्वस्तपदी प्रकाश कुलकर्णी (३११) विजयी झाले, तर अरविंद सुर्वे यांना १५० मते मिळाली.
कार्यकारिणी सदस्यांच्या नऊ जागांसाठी परिवर्तन पॅनेलचे गजानन सावंत (३०९), दिवाकर शेजवलकर (२९८), विनोद साळवी (२९१), आत्माराम नाटेकर (२८९), रजनीश राणे (२८४), अंशुमन पोयरेकर (२७६), सारंग दर्शने (२७४), राजेश खाडे (२७३) आणि किरीट गोरे (२६८) हे विजयी झाले. या निवडणुकीत उमा कदम (१८९), नंदकुमार पाटील (१८६), आशीष बनसोडे (१८१), महेंद्र जगताप (१५५), काशिनाथ म्हादे (१५४), श्रीकांत भोसले (१४७), केतन खेडेकर (१३४), नितीन सोनवणे (१०६) आणि अमृत सुतार (९७) यांचा पराभव झाला.
निवडणुकीच्या निकालानंतर अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, लोणावळा विश्रामधामाच्या नूतनीकरणासह संघात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांवर सदस्यांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. सलग दुसऱ्यांदा सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळवणे हा पत्रकार संघाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा असून, सदस्यांनी परिवर्तन पॅनेलच्या कामगिरीला दिलेली ही मोठी पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.



