लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांकडून रक्कम परत घेण्याबाबत कोणतीही सक्ती नाही - महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Jan 26, 2025
- 1 min read

26 January 2025
मुंबई, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत असल्याच्या बातम्या पूर्णतः असत्य आणि वस्तुस्थितीला धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी केले आहे.
या संदर्भात सचिव यादव यांनी स्पष्ट केले की, योजनेच्या काही लाभार्थी महिला अटी-शर्तींनुसार अपात्र ठरल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. याशिवाय, ज्या महिलांना पुढील कालावधीतील लाभ नको आहे, त्यांनी स्वेच्छेने याबाबत माहिती दिली असून, अशा महिलांना त्यांच्या विनंतीनुसार पुढील लाभ देण्यात येत नाही.
शासनाने कोणत्याही महिलेकडून लाभाची रक्कम परत घेण्यासाठी सक्ती केलेली नाही. महिलांच्या स्वेच्छेने केलेल्या निर्णयांचा आदर करून शासन काम करत असल्याचेही यादव यांनी सांगितले.
महिला व बालविकास विभागाने या संदर्भातील सर्व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
- मिम टाइम्स









