top of page

*वॉर्ड ४७ मध्ये S.I.R. मतदार सहाय्यता केंद्राचे उद्घाटन; मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी नागरिकांना मिळणार एकाच ठिकाणी मार्गदर्शन*

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Jun 30
  • 1 min read

30 June 2026


मुंबई, दि. ३० जून : मालाड (पश्चिम) येथील वॉर्ड क्रमांक ४७ मधील एव्हरशाईन नगर परिसरात आज S.I.R. (Special Intensive Revision) मतदार सहाय्यता केंद्राचे उद्घाटन भाजपा मुंबई महामंत्री तथा सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या हस्ते संपन्न झाले.



मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल, नवीन नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे तसेच निवडणूक आयोगाच्या विविध प्रक्रियांबाबत नागरिकांना सुलभ मार्गदर्शन व आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. विशेषतः प्रथमच मतदान करणारे युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग नागरिकांना या केंद्राचा लाभ होणार आहे.



यावेळी नगरसेवक तेजिंदरसिंग तिवाना, उत्तर मुंबई भाजपा सरचिटणीस निखिल व्यास, माजी नगरसेविका जया सतनामसिंग तिवाना तसेच भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती लावली.



कार्यक्रमात बोलताना नगरसेवक तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले, "लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. S.I.R. मतदार सहाय्यता केंद्राच्या माध्यमातून मतदार नोंदणी आणि दुरुस्तीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणताही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे."



प्रमुख पाहुणे आचार्य पवन त्रिपाठी यांनी मतदार नोंदणीचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाही बळकट करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. त्यांनी या जनहिताच्या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले.



या उपक्रमाचे आयोजन नगरसेवक तेजिंदरसिंग तिवाना यांच्या पुढाकाराने करण्यात आले. वॉर्ड अध्यक्षा नीलिमा कदम तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. उद्घाटन प्रसंगी नवमतदार आणि युवा मतदारांसह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

bottom of page