top of page

अक्कलकोटात सिध्दाराम म्हेत्रे शिवसेनेत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात, शिंदे यांनी म्हेत्रे कुटुंबाची सामाजिक सेवा, जातधर्मापलीकडचं काम आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य याचे कौतुक केले.

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Jun 6
  • 2 min read
ree

6 Jun 2025


अक्कलकोट, सोलापूर: श्रीमंत घराण्यात जन्मूनही जमिनीशी नातं टिकवणारे आणि अहंकार टाळणारे सिध्दाराम म्हेत्रे यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा धारण केला आहे. अक्कलकोट येथे झालेल्या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे शिवसेनेत दाखल झाले. यावेळी शिंदे यांनी काँग्रेसवर घणाघात करत म्हेत्रे बंधूंना "राम-लक्ष्मणाची जोडी" असे संबोधले.

सभेला मंत्री दादा भुसे, संजय राठोड आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचीही उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "सिध्दारामजी म्हेत्रे हे मोठ्या घराण्यातून आलेले असूनही त्यांनी कधीही वडिलांच्या नावाचा गर्व केला नाही. ते कार्यकर्त्यांचा नेता आहेत. काँग्रेसमध्ये दिशा नाही, म्हणून दशा झाली. आता शिवसेनेत आल्यावर सोलापूर आणि अक्कलकोट परिसराचे भवितव्य उजळणार आहे."

शिंदे यांनी म्हेत्रे कुटुंबाची सामाजिक सेवा, जातधर्मापलीकडचं काम आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य याचे कौतुक केले. "म्हेत्रे कुटुंबाच्या कार्यामुळे त्यांना दोन्ही समाजांचा भरघोस पाठिंबा लाभला आहे," असे ते म्हणाले.

“तीन वर्षांपूर्वी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड झाल्यावर आम्ही सत्ता सोडली आणि राज्यात मोठा उठाव घडवून आणला. जगातील ३३ देशांनी त्याची नोंद घेतली. आज आपल्याकडे ६० आमदार आहेत आणि भविष्यात विरोधकांचे तंबू रिकामे होतील,” असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला.

त्यांनी ‘लाडकी बहिण योजना’ बंद होणार नसल्याचे स्पष्ट करत विरोधकांवर दिशाभूल करणाऱ्या प्रचाराचा आरोप केला.

या सभेसाठी तब्बल ११ तास प्रतीक्षा करणाऱ्या जनतेसमोर शिंदे नतमस्तक झाले. हवामानाच्या अडचणींमुळे कार्यक्रम रद्द करण्याची शक्यता असतानाही ते पुण्याहून रस्ते मार्गे येणार होते. मात्र, अखेर गुलबर्गा विमानतळावर लँडिंग करत ते अक्कलकोटला पोहोचले. “स्वामी समर्थांची नगरी आणि सिध्दारामजींना भेटण्याची इच्छाशक्तीच आम्हाला इथवर घेऊन आली,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ या धोरणानुसार काम करायला हवे,” असे आवाहनही शिंदेंनी कार्यकर्त्यांना केले.

राजकीय दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यासाठी ही घटना महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या गडात शिवसेनेने मोठा प्रवेश मिळवला आहे.






















bottom of page