कर्नाटकमधील हल्ल्यानंतर कोल्हापूरहून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बस फेऱ्या रद्द!
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Feb 22
- 1 min read

22 February 2025
मुंबई, कालरात्री कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे घडलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्नाटकातील समाजकंटकांनी महाराष्ट्र एसटी बसवरील चालकांवर हल्ला करून त्यांना काळे फासल्याच्या घटनेमुळे कोल्हापूर विभागातून कर्नाटकात जाणाऱ्या सर्व एसटी बस सेवा पुढील अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत.
परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व प्रभारी व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक भीमनवार यांना यासंदर्भात आवश्यक निर्देश दिले आहेत.
21 फेब्रुवारी रोजी रात्री 9:10 वाजता मुंबई आगाराची बंगळुरू- मुंबई मार्गावर धावणारी एसटी बस (MH14 KQ 7714) चित्रदुर्गजवळ 2 किलोमीटर अंतरावर असताना कर्नाटकातील काही तथाकथित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बस थांबवून चालकावर काळे फासले आणि मारहाण केली. या हल्ल्यात चालक श्री. भास्कर जाधव जखमी झाले असून, त्यांनी तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या घटनेनंतर कोल्हापूर आगाराचे विभाग नियंत्रक यांनी संबंधित बस आणि चालक-वाहकांना सुखरूप कोल्हापूरला परत आणले.
परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी जखमी चालक भास्कर जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांना धीर दिला आणि सांगितले, "तुम्ही या कठीण प्रसंगात एकटे नाही, आपले सरकार तुमच्या पाठीशी आहे." त्यांनी एसटी महामंडळाला निर्देश दिले की, कर्नाटक सरकार याबाबत ठोस भूमिका घेईपर्यंत कोल्हापूर विभागातील सर्व कर्नाटक गाड्या थांबवण्यात याव्यात.
एसटी महामंडळाने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोल्हापूरहून कर्नाटकात जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या पुढील आदेशापर्यंत रद्द केल्या आहेत. सीमावर्ती भागात तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
या घटनेमुळे प्रवासी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.