गणेशोत्सवानिमित्त रील स्पर्धा – प्रथम क्रमांकाला एक लाखाचे बक्षीस
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Aug 27
- 1 min read

27 August 2025
गणेशोत्सवानिमित्त रील स्पर्धा – प्रथम क्रमांकाला एक लाखाचे बक्षीस
मुंबई,राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून यंदा गणेशोत्सवात नव्या पिढीसाठी विशेष रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन होत असून, ही पहिलीच वेळ आहे की राज्यस्तरावर गणेशोत्सव रील स्पर्धा राबवली जात आहे.
सहभागी स्पर्धकांना २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन नावनोंदणी व रील अपलोड करणे आवश्यक आहे. ही स्पर्धा महसूल विभागीय स्तर, राज्यस्तर तसेच महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेरील खुल्या गटात घेण्यात येणार आहे. रीलसाठी पर्यावरण संवर्धन, स्वदेशी, गडकिल्ले, संस्कृती आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ या थीम निश्चित करण्यात आल्या असून, ३० ते ६० सेकंदांच्या कालावधीत रील तयार करणे अपेक्षित आहे.
या स्पर्धेत विभागीय स्तरावरून राज्यस्तरापर्यंत विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावरील विजेत्याला एक लाख रुपये, तर महाराष्ट्राबाहेरील व भारताबाहेरील गटातील विजेत्यालाही एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात येईल. द्वितीय व तृतीय क्रमांकांसह उतेजनार्थ पारितोषिकांचाही समावेश आहे.
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पार पडणार असून, नोंदणीसाठी filmcitymumbai.org या संकेतस्थळावर तसेच महामंडळाच्या सोशल मीडिया हँडल्सवर गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे.









