"चल हल्ला बोल" – सेन्सॉर बोर्ड अधिकारी सिंह यांच्या अरेरावी आणि आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी, दलित पँथरचा आंदोलनाचा इशारा
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Mar 8, 2025
- 2 min read

8 March 2025
सचिन उन्हाळेकर
मुंबई: दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित "चल हल्ला बोल" या चित्रपटाच्या सेन्सॉर प्रक्रियेत मोठा वाद निर्माण झाला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या बैठकीदरम्यान प्रशासकीय अधिकारी राजेंद्र सिंह यांनी मराठी आणि दलित समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वाद पेटला आहे. स्वप्नील ढसाळ यांन यांनी सिंह यांच्या विरोधात अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला असून, सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात दलित पँथरने हल्लाबोल आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
"चल हल्ला बोल" चित्रपटाच्या सेन्सॉर संमतीसाठी आज दिग्दर्शक महेश बनसोड व नामदेव ढसाळ यांचे कुटुंबीय स्वप्नील ढसाळ आणि डॉ. संगीता ढसाळ यांच्यासह काही पँथर कार्यकर्ते सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पोहोचले. मात्र, बैठक सुरू होताच सर्वांचे मोबाईल जप्त करण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.
प्रशासकीय अधिकारी राजेंद्र सिंह यांनी मराठी समजत नसल्यामुळे हिंदीत संवाद साधला. मात्र, त्यांनी चित्रपट संमतीवर चर्चा करण्याऐवजी, "हा सगळा प्रकार प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी आहे," असा आरोप केला. इतकेच नव्हे, तर "नामदेव ढसाळ कोण?" असा प्रश्न विचारून चित्रपटातून वगळलेल्या कवितेबद्दल अनभिज्ञ असल्याचा दावा केला.
स्वप्नील ढसाळ यांनी नामदेव ढसाळ हे आपले काका असल्याचे सांगताच, राजेंद्र सिंह संतप्त होत म्हणाले, "माझ्या काकांविषयी कोणी अवमानकारक भाषा वापरली असती, तर मी जागेवरच त्या अधिकाऱ्याच्या कानाखाली वाजवली असती."
यानंतर त्यांनी "तुम्ही कसे मराठी आहात? आणि कसे दलित आहात?" असे प्रश्न विचारत चित्रपटाच्या उद्देशावर संशय घेतला. त्यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याने उपस्थित दलित पँथर कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला.
दलित पँथरचा हल्लाबोल – गुन्हा दाखल करण्याची मागणी
दलित पँथर संघटनेचे सुमेध जाधव यांनी सांगितले की, "राजेंद्र सिंह यांचे वर्तन अत्यंत अरेरावीचे आणि जातीय द्वेष पसरवणारे आहे. त्यांच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा."
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, "सेन्सॉर बोर्डातील मराठी आणि दलित समाजाच्या चित्रपटांबाबत असलेला पक्षपातीपणा आम्हाला मान्य नाही. आम्ही सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात लवकरच तीव्र आंदोलन करणार आहोत."
सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या संपूर्ण घटनेनंतर मराठी चित्रपट उद्योग आणि सेन्सॉर बोर्डाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दलित पँथर संघटनेच्या आंदोलनाच्या निर्णयामुळे आता सेन्सॉर बोर्डाला यावर स्पष्टीकरण द्यावे लागेल.
या प्रकरणावर सेन्सॉर बोर्डाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, दलित पँथरने उचललेले पाऊल पाहता, सेन्सॉर बोर्डाविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.









