top of page

जम्मू काश्मीरमधील हल्ल्याचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून तीव्र निषेध; दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी

23 April 2025


मुंबई, जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र निषेध केला असून, मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

See video

भुजबळ यांनी या घटनेबाबत एक व्हिडीओद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, “हा हल्ला अत्यंत संतापजनक असून संपूर्ण देशाच्या शांततेवर झालेला घातक प्रहार आहे. या हल्ल्यामध्ये मारले गेलेले पर्यटक मुसलमान नव्हते याची खात्री करून हल्ला करण्यात आला, हे विशेष दुःखदायक आहे.”

छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारकडून या हल्ल्याचा गांभीर्याने तपास करून संबंधित दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या प्रकरणात लक्ष घालून कठोर पावले उचलतील, असा विश्वास आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

या दहशतवादी कृत्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ म्हणाले, “काश्मीरमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांचा परिणाम न पाहवणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला आहे.” त्यांनी हा हल्ला फक्त पर्यटकांवर नाही तर भारताच्या एकात्मतेवर असल्याचे सांगितले.

याप्रकरणी देशातील मुस्लिम नेत्यांनीही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. "मारले गेलेले पर्यटक आमचे हिंदुस्थानी बंधू आहेत आणि असा हल्ला आम्ही सहन करू शकत नाही," असे त्यांनी म्हटले आहे.

भुजबळ यांनी देशातील सर्व नागरिकांना शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करत, “आपल्याला परकीय शक्तींना तोंड देण्यासाठी एकसंघ राहावे लागेल,” असे ठामपणे सांगितले.

या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणातही देशातील जनतेने संयम राखावा आणि सरकार व सैन्याला साथ देऊन या दहशतवाद्यांच्या विरोधात कडक पावले उचलण्यासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.


bottom of page