धाराशिव येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे १५०० किटचे वाटप खासदार रविंद्र वायकर यांनी सढळ हस्ते दिला मदतीचा हात
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- 3 days ago
- 1 min read

16 October 2025
मुंबई : महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी व कुटुंबांच्या मदतीसाठी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र दत्ताराम वायकर यांनी सामाजिक जाणीव जपत प्रत्यक्ष धाराशिव येथे भेट देत पूरग्रस्तांना दिलासा दिला.
धाराशिव जिल्ह्यातील परांडा, कळंब, आढळ, खडकी, सतरागाव, करंजका आदी गावांमधील सुमारे १५०० शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट तसेच दिवाळी निमित्त आर्थिक मदत करण्यात आली.

अलीकडील मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील सुमारे ९७ गावे पुराच्या पाण्याखाली गेली होती. या पुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचे घर, शेत आणि जनावरे वाहून गेली. ही परिस्थिती विविध वृत्तवाहिन्यांवर पाहिल्यानंतर खासदार वायकर यांनी तातडीने आपल्या कार्यकर्त्यांमार्फत आर्थिक मदत पाठवली होती. त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांशी दूरध्वनीवर संवाद साधत लवकरच प्रत्यक्ष भेट देऊन मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
त्याप्रमाणे, संबंधित गावांतील पूरग्रस्तांची माहिती घेऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने तब्बल पाच ट्रक जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स तयार करून धाराशिव येथे पोहोचविण्यात आल्या. प्रत्येक किटमध्ये ४० प्रकारच्या वस्तू, जसे की अन्नधान्य, कपडे, गॅस शेगडी आदींचा समावेश होता. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबांना थोडासा दिलासा मिळावा, यासाठी वायकर यांनी प्रत्येक कुटुंबास आर्थिक मदतही केली.
या मदतकार्यावेळी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील सुमारे ७० पदाधिकारी खासदार वायकर यांच्यासोबत उपस्थित होते.
यामध्ये विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत, वैभव भराडकर, स्वप्नील टेंबवलकर, राजू पेडणेकर, माजी नगरसेविका राजुल पटेल, माजी नगरसेवक सदानंद परब, आत्माराम चाचे, विष्णू सावंत, संजय पवार, डॉ. राहुल महाले, राजू कापसे, प्रकाश शिंदे, संतोष भोसले, मनोज सातारकर, बाबू खोत, संतोष सानप, हुसेन करोड़ी, उपेश सावंत, स्वप्निल सर्वे, बाबू धामापुरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.