पॉलीटेक्निक डिप्लोमा प्रवेशाची अंतिम मुदत 4 जुलै पर्यंत वाढवली
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- 1 day ago
- 1 min read

2 July 2025
मुंबई, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे की, प्रथम वर्ष पॉलीटेक्निक डिप्लोमा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. आता उमेदवार 2 जुलै ते 4 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील, ही अर्ज सादर करण्याची अंतिम संधी आहे.
यापूर्वी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 निश्चित करण्यात आली होती. या कालावधीत एकूण 1,58,876 उमेदवारांनी नोंदणी केली, त्यापैकी 1,38,298 विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून शुल्क भरले. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि अनेक विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून, अर्ज सादर करण्यासाठी आणखी एक अंतिम संधी देण्यात आली आहे.
जे उमेदवार 4 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करून त्याची पुष्टी करतील, त्यांचा समावेश अंतिम गुणवत्ता यादीत केला जाईल.
विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची माहिती, प्रवेश वेळापत्रक आणि इतर तपशीलांसाठी अधिकृत संकेतस्थळ https://dte.maharashtra.gov.in ला भेट देण्याचे आवाहन मंत्री पाटील यांनी केले आहे. सर्व पात्र उमेदवारांनी या अंतिम संधीचा लाभ घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.