top of page

पंकजा मुंडेंना भारावलेल्या बारामतीच्या विकासाची अनुभूती अजित पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक; मराठवाड्यासाठी बारामतीच्या धर्तीवर विकासाचा निर्धार

16 January 2025


मुंबई, राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बारामतीच्या विकासाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचे आणि बारामतीच्या सर्वांगीण विकासाचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, बारामतीत होणारी प्रगतिशील कामे आणि त्यामागील अजित पवार यांची काटेकोर योजना व शिस्तीचे प्रतिबिंब स्पष्टपणे जाणवते.


राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी बारामतीत आलेल्या पंकजा मुंडे यांनी बारामतीतील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, "बारामतीच्या विकासाचा दर्जा अतिशय उच्च असून प्रत्येक प्रकल्पाचे नियोजन दादांनी अचूकतेने केले आहे. अजित पवार यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो, आणि त्यांच्या शिस्तबद्ध कामाची झलक बारामतीच्या प्रत्येक कामातून दिसते. काटेकोरपणा, वक्तशीरपणा आणि प्रगतिशील दृष्टिकोन यांसाठी दादा प्रेरणादायी आहेत."


बारामतीसारखा विकास स्वतःच्या मतदारसंघात व मराठवाड्यात करायचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या, "अजितदादांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा बारामतीला मिळाला आहे. मीही त्यांच्या या दृष्टिकोनातून मराठवाड्याच्या विकासासाठी काम करेन."


बारामतीच्या विकासकामांचा आवाका आणि गुणवत्ता पाहून भारावलेल्या मुंडेंनी अजित पवार यांच्या कार्यशैलीला मान्यता दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे.

Video

bottom of page