बाळासाहेब थोरात यांची मस्साजोग भेट: संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दिलासा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी - काँग्रेसची मागणी
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Dec 26, 2024
- 1 min read

26 December 2024
बीड/मुंबई,बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. या भेटीच्या वेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री आ. अमित देशमुख उपस्थित होते.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवले आहे. या घटनेची चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी थोरात यांनी केली. त्यांनी या हत्येच्या मास्टरमाईंडचा शोध घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली.
"गुन्हेगारांना जात-धर्म नसतो. न्यायालयीन चौकशी होऊन फास्टट्रॅक कोर्टात या प्रकरणाची सुनावणी व्हावी आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे," असे थोरात म्हणाले.
त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "बीड जिल्ह्यात गुन्हेगारांवर प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नाही. पोलिसांकडून एफआयआर देखील नोंदवला जात नाही, ही अतिशय दुर्दैवी स्थिती आहे," असे सांगत काँग्रेस पक्ष सदैव पीडित कुटुंबाच्या पाठीशी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त करत म्हटले की, "परभणी आणि बीड येथील घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणाऱ्या आहेत. दोन्ही घटनांमागील गुन्हेगारांना अटक करून पीडित कुटुंबांना न्याय द्यावा."
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. काँग्रेस पक्षाने या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी तातडीने आणि कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.
Mim Times