महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचा नवा परिपत्रक जारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर, अंतिम यादीची तारीख वाढवली
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Oct 28
- 1 min read

28 October 2025
मुंबई,महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्यासंदर्भात महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. हे परिपत्रक सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असून, मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा त्यात समावेश नाही.
या परिपत्रकानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि आयोगाच्या पूर्वीच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तयार करण्याचा सुधारित कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. याआधी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र आता त्या तारखेला मुदतवाढ देण्यात आली असून मतदार यादीच्या तयारीतील काही टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
आता ३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक विभाग व गणाच्या छापील मतदार याद्या अधिप्रमाणित केल्या जाणार आहेत. त्याच दिवशी या मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्याची सूचना प्रसिद्ध केली जाईल. पुढे १२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान केंद्रांची यादी तसेच मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात येईल.
राज्य निवडणूक आयोगाने एका स्वतंत्र पत्राद्वारे मतदार यादीतील दुबार नावांबाबत विशेष निर्देश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना या बाबींकडे प्राधान्याने लक्ष देऊन त्वरित आवश्यक दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून मतदार यादी शुद्ध आणि अचूक राहील.
ही सर्व कार्यवाही राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार करण्यात येत असून, या परिपत्रकावर उप सचिव के. सूर्यकृष्णामूर्ती यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या या नव्या सूचनांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला वेग आला असून, मतदार याद्या अंतिम स्वरूपात वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
#MaharashtraElectionCommission #VoterListUpdate #ZPandPSElections #LocalBodyElections #MaharashtraNews #ElectionUpdate #VoterList2025 #MaharashtraPolitics









