top of page

महाराष्ट्रात स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना प्रविण दरेकर यांची पहिल्या अध्यक्षपदी निवड; कॅबिनेट दर्जा बहाल

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Sep 29
  • 1 min read
ree

29 September 2025


मुंबई – महाराष्ट्रात गृहनिर्माण क्षेत्रातील महत्त्वाच्या स्वयंपुनर्विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य शासनाने अखेर स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरण या नव्याने स्थापन झालेल्या संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्रविण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना कॅबिनेट मंत्री दर्जाही बहाल करण्यात आला आहे.

गौरतलब म्हणजे, या प्राधिकरणाची शिफारस दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटानेच केली होती. २०१९ मध्ये शासनाने स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना विविध सवलती जाहीर केल्या होत्या; परंतु त्यांची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. परिणामी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मागण्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अभ्यासगट स्थापन केला होता. त्याच्या अहवालात स्वतंत्र प्राधिकरण उभारण्याचा ठोस प्रस्ताव देण्यात आला होता.

ree

माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी प्राधिकरणाच्या स्थापनेचे स्वागत केले. ते म्हणाले, “आमच्या अभ्यासगटाने शासनाला सखोल शिफारसी केल्या होत्या. त्यातील सर्वात महत्त्वाची शिफारस म्हणजे हे प्राधिकरण. मुंबई, उपनगरे, पुणे, नाशिक व नवी मुंबई येथे स्वयंपुनर्विकासाला मोठा प्रतिसाद आहे. या प्राधिकरणामुळे गृहनिर्माण क्षेत्रात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल आणि हक्काचे घर मिळवून देणे शक्य होईल.”


यापूर्वी मुंबई बँकेच्या माध्यमातून काही प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे दरेकर यांनी अधोरेखित केले. शासनाने दिलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळात स्वयंपुनर्विकास क्षेत्रात मोठे काम दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला.


दरम्यान, प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दरेकर यांनी आभार मानले आहेत.



bottom of page