top of page

महाविकास आघाडीचं हप्ते वसुली सरकार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घणाघाती टीका

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Nov 3, 2024
  • 1 min read

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२४ – लाडकी बहिण योजनेअंतर्गत नोव्हेंबरचा हप्ता आधीच बहिणींच्या खात्यात जमा केला आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. "आम्ही हप्ते भरणारे आहोत, तर आधीचे सरकार हप्ता वसुली करणारे होते," असे सांगून त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. कुर्ला मतदारसंघाचे उमेदवार मंगेश कुडाळकर आणि अंधेरी पूर्वचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.


मुख्यमंत्री म्हणाले, "राहुल गांधी यांनी निवडणुकांत खोटी आश्वासने दिली, पण सत्ता आल्यावर लोकांची फसवणूक केली. आम्ही मात्र शब्द पाळतो, फेसबूकवर नाही तर प्रत्यक्ष जनतेत काम करतो." शिंदे यांनी डबल इंजिन सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांचा उल्लेख करत, "आम्ही देणारे आहोत. लाडकी बहिणींच्या खात्यात ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले आहेत," असे सांगितले.

सरकारच्या कल्याणकारी योजनांचा जोर


मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेत १५०० रुपये देण्याची घोषणा केली असून, भविष्यकाळात या रकमेत वाढ करण्याचाही विचार असल्याचे सांगितले. तसेच, "ही योजना बंद करण्याचा विरोधकांचा मनसुबा असल्यास त्यांचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत," असे ठणकावत त्यांनी बहिणींना विरोधकांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले.


दोन वर्षांच्या कालावधीत सरकारने विविध क्षेत्रांत केलेल्या कामांची माहिती देताना, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "मुंबईत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, प्रदूषण कमी करण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह, आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील विमा कवच ५ लाखांपर्यंत वाढवले आहे." तसेच, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी यांसारख्या योजना कार्यान्वित केल्याचे सांगितले.


महायुतीला मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचे आवाहन


शिंदे यांनी कुडाळकर आणि पटेल यांचे काम अधोरेखित करत, "मंगेश कुडाळकर कमी बोलतात पण जास्त काम करतात," असे सांगून मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. "आम्ही दोन वर्षांत इतके काम केले आहे की पाच वर्ष मिळाली तर किती करू हे मतदारांनी विचार करावा," असे सांगून त्यांनी मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचे आवाहन केले.

 
 
bottom of page