मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना अभिवादन केले
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Mar 23
- 1 min read

नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) – शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात शहीद भगतसिंग, शहीद राजगुरु आणि शहीद सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
या कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहीद दिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले आणि तरुण पिढीने त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या त्यागामुळे त्यांचे योगदान अजरामर झाले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवणे आणि त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनीही शहीदांना अभिवादन केले आणि त्यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.