top of page

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, खेड आणि मंडणगड येथे नवीन बाजार समित्यांना मंजुरी – शेतकऱ्यांना मोठा दिलासा

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Apr 19
  • 1 min read
ree

19 April 2025


मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा, काजू, सुपारी, नारळ, कोकम व मासळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या दापोली-खेड-मंडणगड मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाने या तीनही तालुक्यांमध्ये नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आता आपली उत्पादने विक्रीसाठी दूरवरच्या रत्नागिरीपर्यंत नेण्याची गरज भासणार नाही. यापूर्वी जवळपास १५० ते २०० किमी अंतर कापून रत्नागिरी बाजार समितीपर्यंत पोहोचावे लागत होते, ज्यामुळे वाहतूक खर्च, वेळ आणि श्रमांचा मोठा बोजा शेतकऱ्यांवर पडत होता.

राज्याचे राज्यमंत्री मा. श्री. योगेश कदम यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन दापोली, खेड आणि मंडणगड येथे स्वतंत्र बाजार समित्यांची मागणी सातत्याने केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळत राज्य सरकारने मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत या तालुक्यांमध्ये नव्या बाजार समित्या स्थापण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरच विक्रीसाठी सुविधा उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच वाहतूक खर्चात कपात होऊन वेळेची बचतही होईल. या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला असून शेतकरी वर्गातून त्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले जात आहेत.

bottom of page