top of page

शिवरायांच्या जयंतीवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष तीव्र

19 February 2025


मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे. शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. दुसरीकडे, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या अपमानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे.


शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "राहुल गांधींच्या मेंदूला मूळव्याध झालाय का?" असा आक्षेपार्ह सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे म्हणाले, "शिवरायांच्या जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहणारे राहुल गांधी हे अफजलखान फॅन क्लबचे अध्यक्ष शोभतात. त्यांना चौथीच्या इतिहासाचे पुस्तक पाठवण्याची वेळ आली आहे कारण त्यांना शिवरायांचा इतिहास अजिबात माहीत नाही. त्यांच्या आजोबांपासून चालत आलेला शिवद्वेष त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनता काँग्रेस पक्षालाच श्रद्धांजली वाहील."


दुसरीकडे, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. "शिवरायांच्या जयंती निमित्त राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवर भाजपाचे नेते राजकारण करत आहेत. पण त्याआधी त्यांनी मोदींच्या ट्विटकडे पाहावे. शिवरायांचा अवमान भाजपानेच वारंवार केला आहे. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळला, त्याबद्दल भाजपाने अजूनही माफी मागितलेली नाही," असे लोंढे म्हणाले.

अतुल लोंढे यांनी शिवस्मारकाच्या रखडलेल्या प्रकल्पावरूनही भाजपाला लक्ष्य केले. "अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक उभारण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले होते. मात्र, अद्याप या स्मारकाची एकही वीट उभारलेली नाही. भाजपाच्या नेत्यांनीच शिवरायांचा अपमान केला आहे. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे," असे त्यांनी सांगितले.

शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. भाजपाला धारेवर धरतानाच काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांवर टीका करत आहेत. शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे स्मारक यावरून राजकारण तापले असून, यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

bottom of page