संपूर्ण एमएमआर क्षेत्राचा सर्वांगीण विकास दृष्टिपथात* एमएमआर @2047 परिषदेत खासदार श्रीकांत शिंदे यांचे विधान माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष परिषदेत विकासाचा संकल्प
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- 6 minutes ago
- 2 min read

29 June 2026
मुंबई, ता. 29 : "मूलभूत सुविधांसह परवडणारी घरे आणि दळणवळणाच्या अद्ययावत सुविधा या दोन महत्त्वाच्या बाबींसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार कटिबद्ध असून हा सर्वांगीण विकास येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात उतरेल" असे विधान शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून, एमएमआरडीएच्या वतीने मुंबईच्या हॉटेल सहारा स्टार येथे आयोजित करण्यात आलेल्या 'कन्स्ट्रक्शन टाईम्स एमएमआर@2047' या एकदिवसीय परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ सनदी अधिकारी, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार मंगेश कुडाळकर, मुंबईच्या महापौर सौ. रितू तावडे, उपमहापौर श्री संजय घाडी, माजी खासदार आनंद परांजपे, शिवसेना सचिव किरण पावसकर, माजी मंत्री प्रकाश मेहता,संपादक राममूर्ती मायावन यांसह मुंबईतील नगरसेवक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
परिषदेतील राऊंड टेबल सत्रात खासदार श्रीकांत शिंदे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाबाबत राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली.यावेळी शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने अनेक धोरणांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करून लोकहिताचे निर्णय घेतले. समूह पुनर्विकास करताना घरांसोबतच दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए यांसारख्या सर्व यंत्रणांच्या समन्वयातून राबविल्या जाणाऱ्या समूह पुनर्विकास प्रकल्पांमधून एमएमआर क्षेत्राचा कायापालट केला जाईल. दर्जेदार रस्ते, मेट्रोचे जाळे, वॉटर टॅक्सी, पॉड टॅक्सी अशा विविध मार्गांनी दैनंदिन प्रवास सुलभ होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे या दोघांच्या नेतृत्वात एमएमआर क्षेत्राचा कायापालट होईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थित या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर, विविध प्राधिकरणांचे ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि तज्ज्ञांचा उपस्थितीत विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा सत्कार करून या परिषदेची सांगता करण्यात आली.
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील पुनर्विकासाला नवी दिशा देईल
आजवर झोपडपट्टी पुनर्विकासाकडे मर्यादित दृष्टीकोनातून पाहिले जात होते. मात्र, केवळ घर न देता चांगले रस्ते, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि मोकळ्या जागांसह रहिवाशांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशभरातील पुनर्विकास प्रकल्पांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पातून,आशियातील सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट होईल, असेही शिंदे म्हणाले.



