345 राजकीय पक्षांच्या नोंदणीवर गंडांतर; भारत निवडणूक आयोगाची कारवाई सुरू निवडणूक व्यवस्थेच्या शुद्धतेसाठी मोठा निर्णय
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Jun 26
- 1 min read

26 Jun 2025
मुंबई, भारत निवडणूक आयोगाने देशातील ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची (Registered Unrecognized Political Parties - RUPPs) नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईचे नेतृत्व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येत असून, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी देखील या प्रक्रियेत सहभागी आहेत.
या ३४५ पक्षांनी २०१९ पासून आजपर्यंत कोणत्याही निवडणुकीत भाग घेतलेला नाही आणि त्यांची कार्यालये देशात कुठेही अस्तित्वात नसल्याचे निष्पन्न झाले आहे. निवडणूक आयोगाने या पार्श्वभूमीवर देशभरात पडताळणी मोहीम सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात या पक्षांची निवड झाली आहे.
सद्यस्थितीत देशात २८०० हून अधिक RUPPs नोंदणीकृत आहेत. मात्र त्यापैकी अनेक पक्षांनी नोंदणीसाठी आवश्यक अटी पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे, कारवाईसाठी योग्य आधार असलेल्या पक्षांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्याचे निर्देश संबंधित राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. संबंधित पक्षांना सुनावणीची संधी देण्यात येणार असून, अंतिम निर्णय आयोग घेणार आहे.
भारताची राजकीय पक्ष नोंदणी ही लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत होते. नोंदणीकृत पक्षांना करसवलतींसह विविध सरकारी सवलती मिळतात. मात्र, अनेक पक्ष केवळ सवलतीसाठी अस्तित्वात ठेवले जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई होत आहे.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि राजकीय शुचिता यासाठी हा शुद्धीकरण उपक्रम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा पुढील टप्पा लवकरच हाती घेतला जाईल, असेही आयोगाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
#ECI #PoliticalReform #ElectionCleanUp #IndiaPolitics #RUPP #FakeParties #Section29A #LokSabha #AssemblyElections #Democracy #ElectoralTransparency









