‘गणेशोत्सवावर खड्डा कर म्हणजे जिझिया कर!’ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मुंबई महापालिकेवर हल्लाबोल
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Jul 28
- 1 min read

28 July 2025
मुंबई, मुंबई महापालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडपांसाठी १५,००० रुपयांचा ‘खड्डा कर’ (डिपॉझिट) आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाने या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे.
पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी या निर्णयावर सडकून टीका करत म्हटले की,
“गणेशोत्सवावर १५,००० रुपयांचा ‘खड्डा कर’ म्हणजे थेट हिंदू सणांवर लादलेला जिझिया कर आहे! हे सत्ताधाऱ्यांच्या ढोंगी हिंदुत्वाचे दर्शन आहे. जे स्वतःला हिंदूत्ववादी म्हणवतात, तेच आज गणेशभक्तांना आर्थिक दंड ठोठावत आहेत.”
मातेले यांनी स्पष्ट इशारा दिला की,
“जर पालिकेने हा अन्यायकारक निर्णय मागे घेतला नाही, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबई महापालिका आयुक्तांना घेराव घालतील आणि तीव्र आंदोलन छेडतील.”
त्यांनी महापालिकेच्या प्रशासनावर आरोप करत म्हटले की, “खड्ड्यांच्या नावाखाली मुंबईकरांकडून पैसे उकळणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे. जिथे गणेशोत्सवासाठी भाविक उत्साहाने रस्त्यावर उतरतात, तिथे अशा करप्रणालीमुळे लोकांमध्ये रोष आहे.”
पक्षाच्या वतीने लवकरच निवेदन सादर करून ‘खड्डा कर’ त्वरित रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे. अन्यथा, रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महापालिकेने गणेश मंडपांसाठी रस्ते खोदकामामुळे संभाव्य नुकसानीसाठी १५,००० रुपये डिपॉझिट आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अनेक सामाजिक व धार्मिक संघटनांनी याला ‘गणेशोत्सवावरील आर्थिक अडथळा’ म्हणत विरोध केला आहे.