गाझियाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची उपाध्यक्षांसह शिष्टमंडळाने पाहणी


29 March 2026
मुंबई | प्रतिनिधी
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, या दौऱ्यात त्यांनी गाझियाबाद येथे शिल्पकार राम सुतार यांच्या कारखान्यात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या या पुतळ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
या पाहणीवेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे पदाधिकारी तसेच इतर शिष्टमंडळ उपस्थित होते. सन 2018 मध्ये या पुतळ्याच्या उभारणीचे कंत्राट राम सुतार यांच्या कारखान्याला देण्यात आले होते. मात्र, 2026 पर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्यामुळे शासनाने किंमतीतील तफावत तातडीने कंत्राटदाराला देणे आवश्यक असल्याचे अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात त्यांनी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रकल्पातील आर्थिक तफावत दूर करण्याबरोबरच MMRDA कडून कंत्राटदारांना वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, 350 फूट उंचीच्या या भव्य पुतळ्यापैकी सध्या सुमारे 50 फूट काम पूर्ण झाले आहे. पुतळ्याचे बूट आणि पॅंटचा काही भाग तयार झाला असून उर्वरित काम गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू आहे. हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र आता तो 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या स्मारकाबाबत बोलताना अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक भविष्यात एक मोठे पर्यटन आणि प्रेरणास्थळ ठरेल. देश-विदेशातील लाखो अनुयायांसाठी हे एक प्रमुख आकर्षण केंद्र ठरेल, तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे जतन करणारे एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणूनही ते ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
#DrBabasahebAmbedkar #AmbedkarSmarak #InduMill #AnnaBansode #RamSutar #MMRDA #MumbaiNews #Ghaziabad #AmbedkarStatue #Maharashtra #Development #BreakingNews #IndiaNews #SocialJustice #Ambedkarite #StatueProject #Infrastructure #DelhiVisit #PoliticalNews #TrendingNews



