top of page

पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद समाजातील वंचित घटकांना अधिक सक्षम शैक्षणिक संधी देणारी ठरेल : अण्णा बनसोडे

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Oct 16
  • 1 min read
ree

16 October 2025


मुंबई,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यास राज्य सरकारने घेतलेला पुढाकार समाजातील वंचित घटकांना अधिक सक्षम शैक्षणिक संधी देईल, असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.


मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच वर्षांसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रीमंडळाच्या या निर्णयावर बोलताना उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी नगर, नागसेनवन येथील पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाला १ ऑगस्ट २०२५ रोजी भेट दिली होती. हे महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५० मध्ये औरंगाबाद येथे सुरू केलेले महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे, आणि त्याची इमारत बौद्ध स्थापत्यशास्त्राच्या तत्त्वांनुसार बांधलेली आहे.


अण्णा बनसोडे यांनी पुढे सांगितले की, सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहांची जिर्णोद्धार, जतन तसेच नागसेनवन परिसरात ध्यान साधना केंद्राची उभारणी यासह इतर समस्यांवर सरकार सकारात्मक असल्याचा विश्वास दिला होता. त्यानंतर त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून पीईएस सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, पीईएस संस्था, आणि नागसेनवन परिसरात ध्यान साधना केंद्रासाठी शासन अटी शिथील करून विशेष मान्यता देण्याची विनंती केली होती.


राज्य सरकारने बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी ही व्यापक योजना राबवली आहे. छत्रपती संभाजी नगरमधील नऊ शिक्षण संस्था आणि दोन वसतिगृहांचे अद्ययावत करून आधुनिकीकरण, संरचनात्मक सुधारणा आणि विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे अण्णा बनसोडे यांनी सांगितले.


bottom of page