प्रमुख सुरक्षा अधिकारी पदाच्या नियुक्तीलाच थेट आव्हान सुरक्षा अधिकारी वर्गाने पालिका आयुक्तांकडे केली तक्रार
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Jul 27
- 3 min read

27 July 2025
सचिन व्ही.
मुंबई: सध्या पावसाच्या दिवसात एक ठिणगी महानगर पालिकेच्या सुरक्षा विभागात उडाली आहे. प्रमुख सुरक्षा अधिकारी पदी प्रभारी म्हणून विराजमान असलेले अजित तावडे यांच्या नियुक्तीलाच थेट आव्हान देण्यात आलेले आहे. याबाबत पालिका आयुक्तांकडे तक्रार त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांनी केली आहे.
अजित तावडे यांची सुरक्षा विभागातील नियुक्ती ही एकाकी पदावर हंगामी स्वरूपात व सरळ सेवा भरतीतून न झाल्याने त्यांना प्रमुख पदावरुन कमी करण्यात यावे, अशी मागणी सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांकडून जोर धरु लागली आहे. मध्यंतरी याबाबत पालिका उप आयुक्त यांच्या कार्यालयात भेट घेऊन सुरक्षा अधिकाऱ्यांनी तावडे यांना सुरक्षा विभागाच्या प्रमुख पदी विराजमान केल्याच्या विरोधात तक्रार केली होती. तसेच याआधीही कित्येक वेळा अधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाकडे दाद मागितली आहे. आता अजित तावडे यांची थेट प्रभारी वरुन कायमस्वरूपी नियुक्ती ही सुरक्षा विभागाच्या प्रमुख पदी करण्याचे पाऊल पालिका प्रशासनाने उचलले आहे. त्यामुळे पालिका सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
पालिकेच्या सुरक्षा विभागात सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदाची भरती ही सरळ सेवा भरती द्वारे केली जाते. सरळ सेवा भरतीत उमेदवारांची लेखी, तोंडी आणि मैदानी परिक्षा घेऊन गुणांच्या आधारावर सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदाची सेवा जेष्ठता सूची करण्यात येते. सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदावर सात वर्षे सेवा केल्यावर पदोन्नतीने विभागीय सुरक्षा अधिकारी पदावर नियुक्ती केली जाते. पुढे विभागीय सुरक्षा अधिकारी पदावर पाच वर्षे काम केल्यावर पदोन्नतीने उप प्रमुख पदी नियुक्ती केली जाते आणि मग पुढे पदोन्नतीने प्रमुख सुरक्षा अधिकारी पदावर नियुक्ती केली जाते.
मात्र तावडे यांची सुरक्षा विभागातील नियुक्ती ही सरळ सेवा भरतीतून झालेली नाही. तर सुरक्षा दलातील सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकांकडे शस्त्र असावे याकरिता लागणारे परवाने, शस्त्राची डागडुजी व नेमबाजी करिता रेंज व दारुगोळा करीता तावडे यांची सूचना फलकावरील जाहिराती द्वारे त्यांची नियुक्ती ही सहाय्यक सुरक्षा अधिकारी (शस्त्र आणि दारुगोळा) या एकाकी पदावर सुरक्षा विभागात 1996 रोजी करण्यात आली होती.
सरळ सेवा भरतीद्वारे नियुक्ती न झालेली नसताना केवळ एकाकी पदावर नियुक्ती होऊनही तावडे यांची पालिकेच्या सुरक्षा विभागाच्या प्रमुख पदी प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. प्रभारी म्हणून मागील वर्षे काम केल्यावर तावडे यांना आता सुरक्षा विभागाच्या प्रमुख पदी कायमस्वरुपी नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, अशाच एकाकी पदाच्या नियुक्तीचे बढतीचे प्रकरण मुंबई अग्निशमन दलात घडले होते. काही वर्षांपूर्वी अग्निशमन दलातील एका अभियंताची अग्निशमन दलाच्या तांत्रिकी या एकाकी पदावर सहाय्यक अग्निशमन अधिकारी (तांत्रिकी ) म्हणून सुरुवातील नेमणूक करण्यात आली होती. पुढे ते आपल्या सेवा कार्यकाळात उप प्रमुख अग्निशमन (तांत्रिकी ) अधिकारी पदापर्यंत पोहचले होते. पण ते सेवा जेष्ठतेनुसार वरिष्ठ असताना सुद्धा ही त्याचे अग्निशमन अधिकारी (तांत्रिकी ) हे एकाकी पद असल्याने त्यांना प्रमुख अग्निशमन अधिकारी यां पदावर पदोन्नती देण्यात आलेली नव्हती. त्याप्रमाणेच तावडे यांची नियुक्ती ही सरळ सेवा भरतीद्वारे झालेली नसून ते एकाकी पदावर नियुक्ती असताना त्यांना प्रमुख सुरक्षा अधिकारी पदावर नियुक्ती करणे योग्य नसल्याची प्रतिक्रीया अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, यासंबंधातील सर्व कागदपत्रे जोडून अधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आलेली आहे. आमच्या सर्व अधिकाऱ्यांची नियुक्ती सरळ सेवा भरतीतून झालेली आहे. सरळ सेवा भरती प्रक्रिया मध्ये सर्व अधिकाऱ्यांनी लेखी, तोंडी आणि मैदानी परिक्षा पास होऊन गुणांच्या आधारावर आमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पण तावडे यांची सुरक्षा विभागातील नियुक्ती ही सरळ सेवा भरती द्वारे झालेली नसून त्यांनी कोणतेही लेखी, तोंडी तसेच मैदानी परिक्षा दिलेली नाही. त्यांची एकाकी पदावर नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे त्यांची प्रमुख सुरक्षा अधिकारी पदावर नियुक्ती करणे योग्य नाही, याची पालिका प्रशासनाने गंभीरतेने दखल घेऊन आम्हाला न्याय दिला पाहिजे, अशी मागणी पालिका सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रभारी प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलेले की, यासंदर्भात माझ्याकडे कोणतेही तक्रार आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणी प्रतिक्रिया देऊ शकत नाही.