top of page

सेवानिवृत्त पोलीसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या कठोर कारवाईच्या सूचना

10, December 2024


नागपूर: नागपूरच्या गिट्टीखदान परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर शहर पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलीस स्थानकात 6 डिसेंबर 2024 रोजी एफआयआर क्र. 960/2024 नोंदवण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याप्रकरणी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी नागपूर पोलीस आयुक्तांना विशेष सूचनांसह कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

• जामीन रोखण्याचे आदेश: आरोपीला जामीन मंजूर होऊ नये यासाठी पोलिसांनी न्यायालयात प्रभावी युक्तीवाद करावा.

• सीसीटीव्ही आणि इतर पुरावे: घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे तपासले जावेत.

• पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा: या प्रकरणाची नोंद पॉक्सो कायद्यांतर्गत करण्यात यावी.

• तज्ञ समुपदेशकाचे सहकार्य: पीडितेचा जबाब तज्ञ समुपदेशकांच्या मदतीने नोंदवावा आणि तिच्या मानसिक स्थितीसाठी आवश्यक सहकार्य करावे.

• फास्ट ट्रॅक कोर्ट: या प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात यावी.

• पीडितेच्या गोपनीयतेची काळजी: बालहक्क संरक्षण अधिनियम अंतर्गत पीडितेचे नाव समाजमाध्यमांवर उघड होऊ नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी.

• वरिष्ठ अधिकारी नेमणूक: प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपआयुक्त दर्जाचा अधिकारी नेमावा.

• इतर तक्रारींची चौकशी: आरोपीविरुद्ध वस्तीतील अन्य मुलींच्या तक्रारी असल्यास त्याचा शोध घ्यावा.

डॉ. गोऱ्हेंनी या प्रकरणावर कडक उपाययोजना राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नागपूर पोलिसांनी पीडितेला न्याय मिळावा यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी जनतेचीही मागणी आहे.

या घटनेने नागपूर शहरात खळबळ उडाली असून पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी विविध संघटना आणि नागरिक आवाज उठवत आहेत. नागपूर पोलिसांच्या तपासाचा पुढील अहवाल लवकरच सादर होईल, अशी माहिती मिळत आहे.

bottom of page