१५ दिवसांत रस्तेनिहाय कामांचा अहवाल सादर करा – मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Apr 7
- 1 min read

7 April 2025
मुंबई,मुंबई उपनगरातील रस्त्यांची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांना दिले. रस्त्यांची कामे पूर्ण करून त्याचा अहवाल रस्तेनिहाय १५ दिवसांत सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी तातडीने योग्य ती पावले उचलण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आज वांद्रे पश्चिम विभागातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी पालकमंत्री शेलार यांनी केली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
एच-पश्चिम विभागातील वांद्रे, खार, सांताक्रूझ पश्चिम या भागांत सध्या ७४ रस्त्यांवर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. याची पाहणी करून शेलार यांनी पुढील महत्त्वाचे निर्देश दिले:
• ३१ मेपूर्वी सर्व कामे पूर्ण करा:
प्रत्येक रस्त्याच्या ठिकाणी युटिलिटी समन्वयाची अंतिम तारीख निश्चित करून काम वेळेत पूर्ण करा.
• युटिलिटी नुकसानाचा अहवाल:
ज्या भागात युटिलिटीचे नुकसान झाले आहे त्याचा अहवाल तातडीने सादर करावा. त्यावर काय कारवाई होणार आहे, हे स्पष्ट करणारे वेळापत्रक तयार करा.
• नवीन कामांवर बंदी:
सध्या सुरू असलेल्या फेज-१ व फेज-२ मधील मोठे रस्ते ३१ मेपूर्वी पूर्ण करा. नवीन रस्ते खोदण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
• महत्त्वाच्या मार्गांची प्राधान्याने पूर्तता:
गुरु नानक पार्क, खार जिमखाना, बांद्रा जिमखाना, दौलत नगर आयलंड, मधुपार्क ते सांताक्रूझपर्यंतचे वर्तुळाकार रस्ते प्राधान्याने पूर्ण करा.
• १५ दिवसांत अहवाल सादर करा:
प्रत्येक रस्त्याचा पूर्णत्व अहवाल अतिरिक्त आयुक्तांनी १५ दिवसांत सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले.
शेलार यांनी स्पष्ट केले की, कामात विलंब न होता नागरिकांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक उपाय तातडीने राबवावेत. पावसाळा जवळ आल्याने कामांची गती वाढवून गुणवत्ता राखण्याचे निर्देशही देण्यात आले.