top of page

आता राजकीय फटाके

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Oct 30
  • 4 min read
ree

30 October 2025


-- सुनील शिंदे, जेष्ठ पत्रकार


दिवाळीचा सण सरला. कोट्यवधी रुपयांचे फटाके लोकांनी फोडले आणि दिवाळीचा आनंद लुटला. फटाके फोडल्यामुळे जवळपास ४ हजार मेट्रिक टन कचरा पालिकेच्या सफाई खात्यातील कर्मचाऱ्यांनी उचलला. मात्र या फटाकेबाजीमुळे मुंबईची हवा बिघडली आहे. मुंबईत वायू प्रदूषणाची पातळी चांगलीच वाढली होती.


धनत्रयोदशी, नरक चतुर्थी या दोन दिवशी रात्री १० वाजेपर्यंत फटाके वाजविण्याची परवानगी असताना लोकांनी रात्रभर फटाके वाजवले. त्यामुळे हवेचा निर्देशांक ‘वाईट’ श्रेणीत गेला होता. १४ ऑक्टोबरपासून मुंबईत ही परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु ऐन दिवाळीत पावसाने हजेरी लावल्याने हवेचा निर्देशक खाली येण्यास मदत झाली.


अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (मंगळवारी) पावसाने मुंबईला झोडपून काढले. त्यानंतर आणि दिवाळी संपल्यानंतरही पावसाने अद्याप मुंबईकरांची पाठ सोडलेली नाही. ही एका अर्थाने मुंबईकरांना वायू प्रदूषणापासून होणाऱ्या विकारांवर नियंत्रण आणणारी स्थिती आहे, असे म्हणायला हरकत नाही.


मात्र मुंबईत एरव्हीही वायू प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत असते. मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत, अनेक ठिकाणी पुनर्विकासाचे काम सुरू आहे. त्यामुळे उडणारा धुरळा हवेत मिसळून वायू प्रदूषणाची पातळी वाढवतो. खुली मैदाने आणि मोकळी जागा हीही प्रदूषणाला पूरक ठरतात. अशा व्यवस्थेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न महापालिका करत असते, पण तो प्रयत्न तोकडा पडत असल्याचे दिसून येते.


दिवाळीत देशाच्या राजधानी दिल्लीमध्येही फटाक्यांमुळे वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी दिल्ली सरकार कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार आहे. पावसामुळे दूषित वायू कण खाली बसून काही काळासाठी जीवघेण्या प्रदूषणापासून सुटका मिळण्याचा हा प्रयत्न आहे.


मुंबई महानगरपालिकेनेही असा प्रयोग यापूर्वी केला आहे. तसेच जास्त प्रदूषण असलेल्या विभागात पाण्याचे तुषार सोडणाऱ्या गाड्या चालवून पाहिल्या, पण वायू प्रदूषण म्हणावे तसे आटोक्यात आले नाही. पालिकेच्या पर्यावरण विभागानेही त्याबाबत यशाचा दावा कधी केला नाही.


थोडक्यात सांगायचे तर वायू प्रदूषणावर मात करणे आता सोपे राहिलेले नाही.


दिवाळीत आगी लागण्याच्या घटना देखील घडल्या. सणासुदीच्या आनंदाच्या क्षणी अशा दुर्घटनांमुळे जीवितहानी होणे दुःखद आहे. २५ पेक्षा अधिक ठिकाणी आगी लागल्या, त्यापैकी सर्वात मोठी आग जोगेश्वरी (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील १३ मजली जेएनएस बिझनेस सेंटरमध्ये लागली. १७ जणांना धुराचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.


अशा दुर्घटनांमुळे प्रभावित लोकांची दिवाळी कशी गेली असेल हे सांगण्याची गरज नाही. पण या आगीइतकेच माणुसकी हरवलेल्या पालिका अधिकाऱ्यांमुळे अनेक कंत्राटी कामगारांना बोनस मिळाला नाही. अनेक कामगारांचे दोन-दोन महिन्यांचे मानधनही दिवाळीत देण्यात आले नाही. त्यांची दिवाळी कोरडी गेली.


१६ ऑक्टोबर रोजी पालिका आयुक्तांनी कामगारांचा बोनस जाहीर करताना आरोग्य सेविका (CHVs) यांना १४,००० रुपयांची भाऊबीज भेट देण्याची घोषणा केली होती, मात्र ती रक्कम दिवाळी सुरू झाल्यानंतरही मिळालेली नव्हती. ही रक्कम किमान भाऊबीजपूर्वी तरी मिळावी, अशी मागणी मुंबई मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने केली. हा प्रकार दरवर्षी घडत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे — “म्हणायचं दिवाळी भेट, भाऊबीज भेट आणि रक्कम मात्र दिवाळी संपल्यावर मिळते; ही कायमची बोंब आहे,” असे त्यांनी नमूद केले.


ही प्रथा माणुसकीला धरून नाही; त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे. त्याचबरोबर २०२२ पासून सेवानिवृत्त झालेल्या सुमारे ४,५०० बेस्ट कर्मचाऱ्यांना अजून त्यांची देय रक्कम मिळालेली नाही. दिवाळीत त्यांनी आक्रोश केला, पण काही उपयोग झाला नाही. लाखोंच्या घरातील त्यांची देय रक्कम कधी मिळणार, हे कुणालाच माहीत नाही.


अशा प्रकारे काहींची दिवाळी आनंदात गेली, तर काहींची भेट, मानधन आणि निवृत्तीवेतनाच्या प्रतीक्षेत कोरडीच गेली.


राजकीय फटाके


दिवाळीत राजकारण्यांनी फटाक्यांवर नियंत्रण ठेवले होते, पण आता लोकांनी दिवाळीतील दारूचे फटाके फोडून झाल्यानंतर “राजकीय फटाके” फोडायला सुरुवात केली आहे. हे फटाके पालिका निवडणुका होईपर्यंत फुटत राहतील, यात शंका नाही.


राजकीय मंडळी पुन्हा एकदा जानेवारीत होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीकडे वळली आहेत. निवडणूक लढविणे सोपे, पण आघाडी किंवा युतीत जागावाटप करणे अवघड — हेच प्रत्येकवेळी दिसते.


२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली होती, आणि एकनाथ खडसे यांनी ती तुटल्याची घोषणा केली होती. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होत आहे. भाजपने “मुंबई आम्हालाच पाहिजे” म्हणत शिंदे यांना २२७ प्रभागांत ५०-५० टक्के वाटपाचा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे शिंदे यांची अस्वस्थता वाढली आहे, आणि ती स्वाभाविकही आहे.


जून २०२२ मध्ये शिंदे यांनी बंड केले, त्यांच्या सोबत ४० आमदार आणि १३ खासदार गेले. त्यानंतर दहिसरच्या शितल म्हात्रे या पहिल्या माजी नगरसेविका शिंदे गटात गेल्या. हळूहळू शिवसेना व काँग्रेसचे मिळून ६०-६५ माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले.


पालिकेची निवडणूक साडेतीन वर्षे लांबली असल्याने निधीअभावी प्रभागातील कामे थांबली. मतदारांशी संपर्क राखण्यासाठी निधी आणि कार्य दोन्ही आवश्यक असतात. त्यामुळे निधी व उमेदवारीचे आश्वासन मिळताच अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात गेले. त्यामुळे शिंदे सेनेला कमी जागा परवडणाऱ्या नाहीत.


उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी शिंदे यांनी दिल्ली गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, पण काही निष्पन्न झालेले दिसत नाही. कारण अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अहवालावरच घेतला जाईल.


भाजपने १५० जागा लढविण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. इतर पक्षातून आलेल्यांना जास्त प्राधान्य मिळाल्याने मूळ कार्यकर्ते असंतुष्ट झाले आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी “जिथे आमचा तगडा उमेदवार आहे, तिथे आमची लढत पूर्ण असेल” असे स्पष्ट केले.


भाजप सहजासहजी शिंदे सेनेच्या मागणीला मान्यता देईल असे वाटत नाही. त्यामुळेच शिवसेनेचे मंत्री आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटले — “महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर एकमेकांनी दोन पावले मागे घ्यायला हवीत, अन्यथा ‘एकला चलो रे’ हा मार्ग घ्यावा लागेल.”


महायुतीत तणाव असतानाच महाविकास आघाडीतही वेगळी स्थिती नाही. काँग्रेसने आपला ‘सावता सुभा’ स्पष्ट केला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे यांच्या जवळिकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला राज ठाकरे यांना आघाडीत घेणे पसंत नाही.


उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची शक्यता निर्माण झाल्यावर काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले — “आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत लढणार नाही.”


हा निर्णय तळागाळातील कार्यकर्त्यांना उमेदवारी देता यावी म्हणून घेतल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. समाजवादी पक्षानेही स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे.


म्हणजेच सर्वच पक्ष ‘स्वबळा’ची भाषा बोलत आहेत. निवडणुकीनंतर सत्तेजवळ जाण्याइतक्या जागा मिळाल्या तर मात्र हाच सूर बदलेल — यात शंका नाही.


निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी राजकीय फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली आहे. ती कधी शमत नाही — हे सांगायलाच नको.

ree

bottom of page