top of page

आत्मशांती (जीवनाचे खरे रहस्य)

16 January 2025


जीवन ही एक अशी गूढ यात्रा आहे, जिथे प्रत्येक पाऊल काहीतरी नवीन शिकवते. काही प्रवास अतिशय सुखकर, आनंददायक असतात, तर काही इतके कठीण की मन आणि आत्माही अशांत होते. हे जग एक परीक्षा आहे, एक असे प्रांगण, जिथे प्रत्येक क्षण आपल्याला जीवनाचे मौल्यवान धडे देतो. परंतु, आपण त्या शिकवणीला समजून घेतो का? नाही, आपण त्या गोंधळाच्या भूलभुलैयात हरवतो.


     आपण कधी आपल्या मनाला विचारले आहे का की खरी शांती नेमकी कुठे आहे? का गरीब माणूस गरिबीमुळे व्यथित असतो, तर श्रीमंत माणूस प्रचंड संपत्ती असूनही बेचैन असतो? का एखाद्याला आरोग्याची चिंता, तर दुसऱ्याला आजारपणाचा प्रचंड त्रास? का एखाद्याला मुलांच्या स्वभावाचे दुःख असते, तर दुसरा मुलं नसल्याने व्याकुळ होतो? का विवाहित लोक अस्वस्थ असतात, तर अविवाहित लोकही समाधानासाठी धडपडत असतात? गोंधळ, अस्थिरता आणि बेचैनीने भरलेले हे जग आपल्याला जाणीव करून देते की खरी शांती कुठेतरी दूर नाही, ती आपल्या अंतःकरणात लपलेली आहे.


              जीवनातील समस्या का?


     जीवनातील सर्वांत मोठी समस्या ही आहे की आपण या क्षणभंगुर जगाला अंतिम सत्य मानतो, आणि परलोकाच्या शाश्वत सत्याला विसरतो. आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार व्हावी अशी अपेक्षा असते. जेव्हा परिस्थिती आपल्या मनासारखी घडत नाही, तेव्हा आपण अस्वस्थ होतो. परंतु, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की हे जग आपल्या इच्छेने नव्हे, तर अल्लाहच्या उच्च नियोजनाने चालते.


       कुरआन म्हणतेकी,


      “आणि आम्ही खचितच तुम्हाला भय-भूख, जीवित व वित्त हानी आणि तुमच्या प्राप्तीमध्ये घट करून तुमची परिक्षा घेऊ.”


(सूरा अल-बकरा: 155)


      संपत्ती ही गरिबीवरील उपाय नाही, कारण संपत्ती असलेल्या लोकांचे दुःख गरिबीपेक्षा मोठे असते. आरोग्य आणि आजारपण दोन्ही परीक्षा आहेत, ज्यात संयम आणि आभार या दोन गोष्टींचा अनिवार्य समावेश असतो. लग्न असो वा एकटेपणा, प्रत्येक स्थिती ही परीक्षा आहे. तिचा खरा उपाय म्हणजे अल्लाहच्या इच्छेला स्वीकारणे.


               शांती कुठे आहे?


     शांती ही एका अलौकिक अवस्थेचे नाव आहे, जी संपत्तीतून, प्रसिद्धीतून, माणसांकडून किंवा भौतिक वस्तूंमधून मिळत नाही. शांती फक्त अल्लाहच्या जवळीकतेत आहे. शांती यामध्ये आहे की आपण प्रत्येक परिस्थितीत अल्लाहच्या निर्णयांवर समाधानी राहावे.


    आदरणीय मोहम्मद (सलअम) यांनी सांगितले की,


    “संपत्ती म्हणजे जास्त मालमत्ता असणे नाही, खरे धन हे आहे की हृदय समाधानी असेल.”


(सहीह बुखारी: 6446, सहीह मुस्लिम: 1051)


        शांती मिळवण्यासाठीचे उपाय


1. साधेपणा स्वीकारा


जीवनात साधेपणा आणा. जगाचे ओझे स्वतःवर लादू नका. आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवा.


2. आभार व्यक्त करा


       जीवनातील प्रत्येक स्थितीत आभारी राहा. आभार मानणे मनातील अस्वस्थता दूर करते आणि अल्लाहच्या कृपेबद्दल जागरूक करते.


कुरआन म्हणते की ,


      “आणि स्मरण ठेवा, तुमच्या पालनकर्त्याने सावध केले होते की जर कृतज्ञ बनाल तर मी तुम्हाला आणखी जास्त उपकृत करीन आणि जर कृतघ्नता दर्शवाल तर माझी शिक्षा फारच कठोर आहे.”


         (सूरा इब्राहीम: 7)


3. तकवा (इशभय) स्वीकारा


जीवनाला अल्लाहच्या आज्ञेनुसार चालवा. गुनाहांपासून दूर राहा आणि नीयत शुद्ध ठेवा.


कुरआनमध्ये म्हटले आहे की,


   “ त्या प्रत्येक इसमाला जो अल्लाह आणि मरणोत्तर जीवनाच्या दिवसावर श्रद्धा ठेवीत असेल. जो कोणी अल्लाहच्या प्रकोपाला भिऊन काम करील, अल्लाह त्याच्यासाठी अडचणीतून निघण्याचा एखादा मार्ग निर्माण करून देईल”


         (सूरा अत्-तला.क: 2)


  4. संयम ठेवा


      जीवनातील प्रत्येक अडचण ही एक परीक्षा आहे. संयम ठेवा, कारण संयम करणाऱ्यांना अल्लाहने जन्नतचे वचन दिले आहे.


कुरआन म्हणते की,


     “(हे पैगंबर (स.)) सांगा की हे माझ्या दासांनो, ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा. ज्या लोकांनी या जगात सद्वर्तन अंगिकारले आहे, त्यांच्यासाठी कल्याण आहे आणि अल्लाहची पृथ्वी विशाल आहे, संयम बाळगणार्‍यांना तर त्यांचा मोबदला बेहिशोबी देण्यात येईल.”


(सूरा अझ्-झुमर: 10)


5. आध्यात्मिक शुद्धता मिळवा


     जगाच्या मोहात अडकू नका. आपल्या अंतःकरणाला शुद्ध ठेवा आणि अल्लाहशी नाते दृढ करा.


              जीवनाचे खरे रहस्य


       या जगात खरी शांती त्यांनाच मिळते, जे आपला जीवनाचा खरा उद्देश ओळखतात. हे जग एक परीक्षा आहे; आपले अंतिम लक्ष्य परलोक आहे.


जो कोणी अल्लाहच्या स्मरणात समाधान शोधतो, त्याला शांती मिळते.


     “जगातील सर्व गोंधळ हृदयाला कधीही शांत करू शकत नाही, पण अल्लाहच्या स्मरणात प्रत्येक अस्वस्थ मनाला शांती मिळते.”


   “असलेच लोक आहेत ते ज्यांनी (या पैगंबराचे आवाहन) मानले आहे आणि त्यांच्या हृदयांना अल्लाहच्या स्मरणाने समाधान प्राप्त होते. जाणून असा! अल्लाहचे स्मरणच ती गोष्ट आहे ज्याने हृदयाला समाधान लाभत असते.”


            (सूरा अर-रअद: 28)


आसिफ खान


धामणगाव बढे


जिल्हा बुलढाणा


94 05 93 22 95

bottom of page