चल हल्ला बोल’ चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाची गंडांतर, दलित पँथर उद्या घेणार बैठक
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Mar 6
- 1 min read

6 March 2025
मुंबई: प्रसिद्ध कवी आणि दलित चळवळीचे नेते नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ या मराठी चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. चित्रपटास प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाने तब्बल ११ कट सुचवले असून, अधिकाऱ्यांनी "कोण नामदेव ढसाळ?" असा उर्मट सवाल करत वादाला तोंड फोडले आहे.
या पार्श्वभूमीवर, दलित पँथर संघटनेने उद्या सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात विशेष बैठक आयोजित केली आहे. या बैठकीचे नेतृत्व दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. स्वप्निल ढसाळ करणार आहेत. स्वप्निल ढसाळ हे नामदेव ढसाळ यांचे पुतणे असून, त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
"बैठकीनंतर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांना सविस्तर माहिती देणार आहोत. संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे, जाहीर माफी मागावी आणि चित्रपटाला प्रदर्शित करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत," असे डॉ. स्वप्निल ढसाळ यांनी सांगितले.
२०० चित्रपट अडकल्याचा दावा
ढसाळ यांनी सेन्सॉर बोर्डाच्या नियमांच्या अभावामुळे सुमारे २०० मराठी चित्रपट प्रेक्षपणासाठी रखडल्याचा दावा केला आहे. “ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीज आणि चित्रपटांना कोणताही आक्षेप नसतो, मात्र सत्य घटनांवर आधारित सामाजिक विषय हाताळणाऱ्या चित्रपटांना मात्र अडवले जाते. ही दुटप्पी भूमिका योग्य नाही,” असे ते म्हणाले.
‘लोकांचा सिनेमा’तून तयार झालेला चित्रपट
‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट महेश बनसोडे यांनी ‘लोकांचा सिनेमा’ या चळवळीच्या माध्यमातून लोकवर्गणीतून निर्माण केला आहे. दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक, मुस्लिम, शेतकरी आणि महिलांचे शोषणाविरुद्धचा लढा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत या चित्रपटावर ११ कट लावण्याचे आदेश दिले आहेत.
आता सेन्सॉर बोर्डाच्या बैठकीत आणि मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत या प्रकरणाला काय वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.