जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती विद्यार्थी संघातर्फे गोवंडीत भव्य फुटबॉल स्पर्धा; युवक-युवतींनी घेतली तंबाखूविरोधी शपथ
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- May 31
- 1 min read

31 May 2025
गोवंडी, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती विद्यार्थी संघाच्या वतीने आज गोवंडी येथील झाकीर हुसेन नगर मैदानात युवक आणि युवतींसाठी भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये मानखुर्द, गोवंडी, चेंबूर परिसरातील मुलांचे २० संघ आणि मुलींचे ८ संघ सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. इरफान शेख (CSR मॅनेजर, सनफार्मा), श्री. प्रकाश राजन, श्री. संतोष सुर्वे (जनजागृती विद्यार्थी संघ), मनिषा लोकरे (कोटक महिंद्रा एज्युकेशन फाऊंडेशन) यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी "तंबाखू नको – मैदानी खेळ स्वीकारा – आरोग्य चांगले ठेवा" या संदेशावर मुलांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले.
See video
कार्यक्रमात पोस्टर प्रदर्शन, चर्चा सत्र व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. “नशा नको, जीवन हवे” या संकल्पनेवर जनजागृती विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित युवक-युवतींना तंबाखू व अमली पदार्थांविरोधात शपथ दिली. सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या या शपथेत सर्वांनी तंबाखूजन्य व अमली पदार्थांचे सेवन न करण्याची आणि इतरांना व्यसनमुक्त करण्याची ग्वाही दिली.
या स्पर्धेला CRY (Child Rights and You) आणि ALKYL CSR यांचे आर्थिक सहकार्य लाभले. मुलींच्या गटात मानखुर्द येथील JVS संघाने अंतिम फेरीत विजय मिळवत चॅम्पियनचा किताब पटकावला, तर संघ 'संकल्प' उपविजेता ठरला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन श्रुती चव्हाण, अफसर खान, शाकीर बागवान, पार्वती चव्हाण, किसन सलबुल, योगिता अहिरे, प्रतिक्षा सोलकर यांनी केले. पंच म्हणून जमाल शेख, रिजवान कुरेशी, तौकीर सर, शहीद सर, मधु पाठक यांनी भूमिका पार पाडली.
या उपक्रमामध्ये युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत, आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा स्वीकार करत व्यसनमुक्त समाजासाठी पुढाकार घेण्याची सकारात्मक पावले उचलली. जनजागृती विद्यार्थी संघ, CRY, ALKYL CSR आणि सर्व आयोजकांचे आभार मानत उपस्थितांनी एकत्रितपणे तंबाखूमुक्त भविष्याचा निर्धार व्यक्त केला.









