top of page

जुने जैन मंदिर मनपाकडून निष्कासित; कारवाईवर समाजाचा संताप, शेकडो नागरिकांचा तीव्र विरोध, दबावाखाली अधिकाऱ्याची बदली

20 April 2025


मुंबई,विलेपार्ले पूर्व येथील कांबळीवाडी परिसरात नेमिनाथ सहकारी गृहनिर्माण सोसायटी शेजारील जुने जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी तातडीने निष्कासन कारवाई करत जमीनदोस्त केले. या प्रकारामुळे संपूर्ण जैन समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून, शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला आहे. कारवाई दरम्यान मंदिरात महिला, वृद्ध आणि पुजारी उपस्थित असतानाही त्यांना कोणतीही मोहलत न देता पोलिस बळाचा वापर करत बाहेर काढण्यात आले.

विशेष म्हणजे या कारवाईच्या विरोधात १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, महानगरपालिका प्रशासनाने सकाळी ८ वाजताच मोठ्या घाईगडबडीत मंदिरावर हातोडा चालवला. सकाळी ११.४५ च्या सुमारास उच्च न्यायालयाची स्थगिती आदेश येईपर्यंत मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

सदर मंदिरावरील निष्कासन आदेश २००५ पासून विविध न्यायालयांत सुरू होते. सिटी सिव्हील न्यायालयाने २००८ मध्ये, उच्च न्यायालयाने २०११ मध्ये आणि सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये निष्कासनास मान्यता दिली होती. मात्र, २०२५ मध्ये मंदिर व्यवस्थापनाने पुन्हा न्यायालयात अर्ज दाखल करून स्थगिती मिळवली होती. १४ एप्रिल २०२५ रोजी सिटी सिव्हील कोर्टाने तोडफोड न करण्याची मुदत दिली होती. परंतु मोशन अर्ज रद्द झाल्याने महानगरपालिकेने तातडीने कारवाई सुरू केली.

या कारवाईच्या वेळी सुमारे ७०-८० जैन महिला आणि पुरुष मंदिरात उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाकडे मूर्ती, धार्मिक ग्रंथ आणि पूजेचा साहित्य सुरक्षित बाहेर नेण्याची विनंती केली होती. मात्र, प्रशासनाने ती विनंती मान्य न करता तातडीने पोलीस बळाचा वापर करून मंदिर रिकामे केले.

नंतर संजय अमृतलाल जैन, मनोज जैन आणि गौरव जैन यांच्या उपस्थितीत मूर्ती आणि साहित्य बाहेर काढण्यात आले. ११.४५ वाजता सतिष आणेकर या अधिकाऱ्यांना न्यायालयाने स्थगिती दिल्याचा फोन आला, त्यानंतर कारवाई थांबवण्यात आली.

या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे सांगून जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी ही कारवाई पूर्वनियोजित असून एखाद्या दबाव किंवा प्रलोभनामुळे झाली असावी असा संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या मागणीवरून संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे.

जैन समाजाचे म्हणणे आहे की, हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नव्हते, तर त्यांच्या संस्कृतीचे प्रतीक होते. त्यांनी सरकारकडे या जागेवरच मंदिराची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याची मागणी केली असून, धर्मनिरपेक्ष भारतात अल्पसंख्यक समाजावर असा अन्याय अमान्य आहे, असा ठाम निषेध व्यक्त केला आहे.


bottom of page