डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात विपश्यना केंद्र स्थापनेसाठी सरकार सकारात्मक
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- 2 days ago
- 1 min read

16 October 2025
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर परिसरातील ५० एकर जागा विपश्यना केंद्र उभारणीसाठी सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रज्ञा प्रसार धम्मसंस्कार केंद्र भिक्खू संघाने केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची भेट घेत भिक्खू संघाने ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी मांडण्याची विनंती केली. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी सरकार विपश्यना केंद्र स्थापनेसाठी सकारात्मकता दाखवेल अशी ग्वाही दिली.
छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठाच्या परिसरातील सुमारे ५० एकर जागेवर प्राचीन आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या बौद्ध लेणी आहेत. येथे धम्म-प्रचार-प्रसार, धम्मसंस्कार, विपश्यना शिबिरे, ध्यान वंदना तसेच विविध बौद्ध धार्मिक व सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी विजया दशमी व बुद्ध जयंतीला महाराष्ट्रासह भारतभरातून तसेच परदेशातून १० लाखाहून अधिक श्रद्धावान बौद्ध अनुयायी येथे येतात.
स्थळाचे ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व लक्षात घेऊन ही ५० एकर जागा “विपश्यना केंद्र" म्हणून प्रज्ञा प्रसार धम्मसंस्कार केंद्रास कायमस्वरूपी वापरासाठी देण्याची मागणी आहे. विद्यापीठाने जागा देण्यास होकार दर्शवला असून सरकारही याबाबत लवकर सकारात्मक निर्णय घेईल, असे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले. लवकरच ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडली जाणार आहे.