तळोजा एमआयडीसी घोटाळा: भूखंडाचे 'ट्रेडिंग' करून शासनाचे ५०० कोटी बुडवले; विधानसभेचे उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिले चौकशीचे निर्देश
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Oct 14
- 1 min read

14 October 2025
नवी मुंबई/मुंबई: तळोजा एमआयडीसीतील भूखंडांचे विभाजन करून अवैधरित्या विक्री केल्याच्या प्रकरणात ‘महादेव इम्पेंक्ट्स्’ ही कंपनी अडचणीत आली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. १४ ऑक्टोबर) झालेल्या आढावा बैठकीत या गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला.
भूखंडाचे विभाजन व विक्री:
एमआयडीसी क्षेत्रातील ए-३ क्रमांकाचा भूखंड खरेदी केल्यानंतर, महादेव इम्पेंक्ट्स् कंपनीने अवघ्या सात महिन्यांच्या आत कोणताही उद्योग सुरू न करता तो भूखंड सोळा तुकड्यांमध्ये विभागून विविध उद्योजकांना विकल्याचे उघड झाले आहे. हे कृत्य एमआयडीसीच्या नियमांचे सरळ उल्लंघन असल्याचे नमूद करण्यात आले.
५०० कोटींच्या महसुलावर गदा:
या बेकायदेशीर भूखंड ‘ट्रेडिंग’मुळे शासनाचा सुमारे ५०० कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे. भूखंडाचे विभाजन करताना आकारला जाणारा दंड आणि ३० टक्के फरकाची रक्कम वसूल न करता पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्याबद्दल उपाध्यक्ष बनसोडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी एमआयडीसीच्या पनवेल प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तातडीने कारवाईसाठी निर्देश:
उपाध्यक्ष बनसोडे यांनी एमआयडीसी प्रशासनाला महादेव इम्पेंक्ट्स् कंपनीवर तातडीने कारवाई करून भूखंडाचे वाटप रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिस आयुक्त (नवी मुंबई), एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि पनवेलचे प्रांताधिकारी यांचा समावेश असलेले विशेष पथक स्थापन करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.









