तुर्कीमध्ये "चल हल्ला बोल" ला उत्स्फूर्त प्रतिसाद, पण भारतात सेन्सॉर बोर्डाची अडचण
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Mar 8
- 1 min read
Updated: Mar 9

8 March 2025
सचिन उन्हाळेकर
मुंबई: सुप्रसिद्ध कवी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित "चल हल्ला बोल" या चित्रपटाने तुर्कीमध्ये यश मिळवले असले तरी, भारतात अद्याप सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालेले नाही. तुर्कीमधील प्रेक्षकांकडून चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असून, ते चित्रपटाचे कौतुक करत आहेत.
विशेष म्हणजे, तुर्कीतील प्रसिद्ध संगीतकार सेरकन अकमन यांनी या चित्रपटासाठी संगीत दिले आहे. "लोकवर्गणीतून निर्माण झालेला लोकांचा सिनेमा" या संकल्पनेवर आधारित "चल हल्ला बोल" हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटासाठी अनेक कलाकारांनी आपापली कला दान केली असून, कोणी आर्थिक, तर कोणी वस्तू किंवा धान्याच्या स्वरूपात मदत केली आहे.
सेन्सॉर बोर्डाची भूमिका व वादग्रस्त कट
भारतात नामदेव ढसाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असले तरी, सेन्सॉर बोर्डाने त्यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला अनेक आक्षेप नोंदवले आहेत. बोर्डाने "नामदेव ढसाळ कोण?" असा प्रश्न विचारत प्रमाणपत्र रोखले आहे. चित्रपटातील काही दृश्ये आणि ढसाळ यांच्या कवितांवर आक्षेप घेत त्यामध्ये अनेक कट करण्याचा सल्ला दिला गेला आहे.
दलित पँथरचा हल्लाबोल आंदोलनाचा इशारा
चित्रपटाच्या प्रदर्शनावर अडथळे येत असल्याने दलित पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. स्वप्नील ढसाळ आणि राष्ट्रीय महासचिव डॉ. संगीता ढसाळ यावर नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेचे नेते सुमेध जाधव यांनी स्पष्ट केले की, चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी ते लवकरच "हल्ला बोल" आंदोलन छेडणार आहेत.
तुर्कीचा संगीतकार सेरकन अकमन यांची प्रतिक्रिया
तुर्कीतील संगीतकार सेरकन अकमन यांनी "चल हल्ला बोल" साठी आपले संगीत दान केले आहे. त्यांच्या मते, भारतीय आणि तुर्की संस्कृतींमध्ये देवाणघेवाण होण्यासाठी हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली असून, लोकांनी चित्रपट पाहावा आणि त्याचे समर्थन करावे, असे आवाहन केले आहे.
व्हिडिओत पाहा: तुर्की संगीतकार सेरकन अकमन यांची प्रतिक्रिया आणि सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर भाष्य.