पर्यटकांच्या रक्षणासाठी प्राण गमावणाऱ्या सय्यद आदिलच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत; घर बांधून देण्याचे आश्वासन
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Apr 25
- 1 min read

25 April 2025
मुंबई, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात धाडसाने पर्यटकांचे प्राण वाचवताना वीरमृत्यू आलेल्या २० वर्षीय सय्यद आदिल हुसैन शाह यांच्या कुटुंबियांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. शिवाय, त्यांच्या मोडकळीस आलेल्या घराचे पुनर्बांधणीसाठीही मदत करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिले.
सय्यद आदिल हा स्थानिक युवक पर्यटकांना घोड्यावरून सफर घडवण्याचे काम करत होता. हल्ल्याच्या प्रसंगी त्याने माणुसकी व धाडस दाखवत एक पर्यटक वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान त्याने एका दहशतवाद्याची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र या झटापटीत त्याला गोळ्या लागून त्याचा मृत्यू झाला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः श्रीनगरला जाऊन हल्ल्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली होती. या पर्यटकांनी सय्यदने दाखवलेले धाडस आणि माणुसकीचे उदाहरण सांगताच, शिंदे यांनी तत्काळ मदतीचा निर्णय घेतला.
आज शिवसेना कार्यकर्ते व 'सरहद' संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सय्यदच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी स्थानिक आमदार सईद रफीक शाह उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि त्याच्या बलिदानाचे कौतुक करत घर बांधून देण्याचे आश्वासनही दिले.
"सय्यद आदिलने दाखवलेली माणुसकी आणि शौर्य हे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. त्याचे बलिदान व्यर्थ जाणार नाही," असे भावनिक शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.