top of page

✦ पोलिसांच्या प्रश्नांवर विरोधी पक्ष आक्रमक, सरकारकडे मागणीची झोड ✦ अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात पोलिसांच्या अडचणी मांडल्या; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Jul 2
  • 1 min read
ree

2 July 2025


मुंबई, राज्यातील पोलीस दलाला भेडसावणाऱ्या अनेक मूलभूत प्रश्नांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात ठाम भूमिका घेत सरकारचे लक्ष वेधले. निवासस्थान, आरोग्य, कार्यकाल, डिजी लोन यांसारख्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी आवाज उठवित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला.


दानवे यांनी निदर्शनास आणून दिले की, जरी पोलीस कर्मचाऱ्यांचा अधिकृत ड्युटी कालावधी आठ तासांचा असला, तरी प्रत्यक्षात त्यांना १२ तासांहून अधिक काळ काम करावे लागते. मुंबई पोलिस दलातील अनेक पोलीस वसई, विरार, नवी मुंबई, पनवेल, कर्जत आणि कसारा यांसारख्या दूरवरच्या भागांत वास्तव्यास आहेत. प्रवासासह किमान १६ ते १८ तास त्यांचा दिवस खर्च होतो, त्यामुळे व्यायाम, विश्रांती आणि कुटुंबासोबत वेळ घालविण्याची संधी मिळत नाही.


आरोग्याच्या दृष्टीनेही ही परिस्थिती गंभीर असल्याचे दानवे यांनी नमूद केले. "संपूर्ण देशात सर्वाधिक पोलीस मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने होत आहेत," असे सांगत त्यांनी पोलिसांच्या आरोग्य व्यवस्था सुधारण्याची मागणी केली.

तसेच, अनेक पोलिसांच्या शासकीय निवासस्थानांची दुरवस्था झाली असून, दीर्घकाळापासून डीजी लोन (गृहकर्ज सुविधा) प्रलंबित आहेत. "राज्य सरकार या प्रश्नांकडे केव्हा लक्ष देणार?" असा रोखठोक सवाल त्यांनी केला.


यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले की, "मुंबईतील मोडकळीस आलेल्या पोलिसांच्या इमारतींचे लवकरच नूतनीकरण करण्यात येणार असून, डिजी लोनच्या प्रलंबित अर्जांचा निर्णयही लवकरच घेतला जाईल."


पोलीस दलाच्या हितासाठी योग्य धोरण राबवले जाईल, असेही त्यांनी सांगितले.




bottom of page