प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते वेव्हज् 2025 चे उद्घाटन; ग्लोबल मीडिया मंचाची ऐतिहासिक सुरुवात 90 देश, हजारो प्रतिनिधी आणि स्टार्टअप्स यांचा सहभाग; मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राला नवे पंख
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- 5 days ago
- 2 min read

30 April 2025
मुंबई, भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. महाराष्ट्र शासन या ऐतिहासिक परिषदेचे यजमानपद भूषवत असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल.
“कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रिज” या घोषवाक्याखाली होणाऱ्या या चार दिवसीय परिषदेत भारताला एक जागतिक मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तन केंद्र म्हणून उभारण्यावर भर दिला जाणार आहे.
वेव्हज् 2025 परिषदेच्या माध्यमातून चित्रपट, ओटीटी, गेमिंग, कॉमिक्स, डिजिटल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, एव्हीजीसी-एक्सआर ब्रॉडकास्टिंग यांसह नव्या तंत्रज्ञानांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सर्जनशील दृष्टिकोनाशी सुसंगत या उपक्रमातून 2029 पर्यंत भारतात 50 अब्ज डॉलर्सच्या बाजारपेठेची संधी निर्माण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
परिषदेचे विशेष आकर्षण म्हणजे ग्लोबल मीडिया डायलॉग (GMD) चे आयोजन, ज्यामध्ये 25 देशांचे मंत्री सहभागी होतील. याशिवाय, वेव्हज् बाजार या जागतिक ई-मार्केटप्लेसमध्ये 6,100 खरेदीदार, 5,200 विक्रेते आणि 2,100 प्रकल्प सहभागी होत असून, स्थानिक व जागतिक व्यवसायांसाठी मोठ्या प्रमाणावर नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
पंतप्रधान मोदी “क्रिएट इन इंडिया” उपक्रमांतर्गत क्रिप्टोस्पियर ला भेट देतील आणि निवड झालेल्या सर्जनशील कलाकारांशी संवाद साधतील. ते भारत आणि महाराष्ट्र पॅव्हेलियन ना देखील भेट देतील. या उपक्रमासाठी एक लाखांहून अधिक नोंदण्या झाल्या आहेत.
वेव्हज् 2025 परिषदेत 90 हून अधिक देशांचे प्रतिनिधी, 10,000 प्रतिनिधी, 1,000 कलाकार, 300 पेक्षा जास्त कंपन्या आणि 350 हून अधिक स्टार्टअप्स सहभागी होत आहेत. परिषदेत 42 मुख्य सत्रे, 39 विशेष सत्रे आणि 32 मास्टरक्लासेस घेतले जाणार आहेत, ज्यात ब्रॉडकास्टिंग, इन्फोटेन्मेंट, एव्हीजीसी-एक्सआर, चित्रपट आणि डिजिटल मीडिया या क्षेत्रांचा समावेश आहे.
ही परिषद केवळ भारताच्या सर्जनशील आणि तांत्रिक क्षमतेचे प्रदर्शन नसून, भारताला जागतिक मीडिया महासत्ता बनवण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल ठरणार आहे.