top of page

मराठा आरक्षण मोर्चासाठी २९ ऑगस्टला मुंबईतील महत्त्वाचे रस्ते बंद, वाहतूक वळविण्याचा पोलिसांचा आदेश

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Aug 28
  • 1 min read
ree

28 August 2025


मुंबई, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण मोर्चा २९ ऑगस्ट रोजी पनवेल-सायन महामार्गाने वाशी नाका मार्गे मुंबईत प्रवेश करून आझाद मैदानाकडे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेसंदर्भात विशेष आदेश जारी केले असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) प्रियांका नारनवरे यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत अधिकारांचा वापर करून जारी केलेल्या अधिसूचनेनुसार काही महत्त्वाचे रस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहतील. पनवेल-सायन महामार्ग, व्ही.एन. पुरव मार्ग, पूर्व मुक्त मार्ग, पी.डी’ मेलो रोड, वालचंद हिराचंद मार्ग, डॉ. दादाभाई नौरोजी रोड व हजारीमल सोमानी रोड हे रस्ते केवळ आपत्कालीन सेवांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असतील.


मोर्चाचा मार्ग वाशी नाका, मानखुर्द पूल, भक्ती पार्क, शिवडी, माझगाव, कर्नाक बंदर, जनरल पोस्ट ऑफिस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा असणार आहे. या ठिकाणी देखील वाहतूक नियंत्रित करण्यात येणार आहे.


याशिवाय घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, अगरवाल व्हिलेज रोड, बी.एस. देवाशी मार्ग (गोवंडी स्टेशन रोड), देवनार व्हिलेज रोड, सी.जी. रोड/कोलवाडा बोरला रोड यांसारखे काही महत्त्वाचे अंतर्गत रस्ते आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येणार आहेत.


वाहतूक पोलिसांनी नागरिकांना २९ ऑगस्ट रोजी या परिसरात अनावश्यक प्रवास टाळण्याचे तसेच पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.


bottom of page