मराठी भाषा दिनानिमित्त मराठी कवितेचा जागर; ज्येष्ठ आणि युवा कवींनी सादर केल्या रचना
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Mar 1
- 1 min read

01 March 2025
मुंबई : मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई मराठी पत्रकार संघ आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी कवितेचा जागर करणारा एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, महेश केळुसकर यांच्यासह अनेक युवा कवींनी आणि पत्रकारांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी मराठी भाषेच्या संवर्धनावर भर देण्याची गरज अधोरेखित केली. “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता या दर्जाला टिकवण्याची जबाबदारी आपली आहे,” असे मत ज्येष्ठ कवींनी व्यक्त केले. जागतिक मराठी अकादमी आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सहकार्याने मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी अधिक भरीव उपक्रम हाती घेतले जातील, असेही सांगण्यात आले.
कार्यक्रमात कविसंमेलनाच्या माध्यमातून विविध कवी आपल्या रचना रसिकांसमोर मांडल्या. रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, महेश केळुसकर, शशिकांत तिरोडकर, संकेत म्हात्रे, प्रथमेश पाठक, जितेंद्र लाड, मंगेश विश्वासराव, भगवान निळे, सदानंद खोपकर, अजय वैद्य आणि प्रसाद मोकाशी यांनी आपल्या विविध विषयांवरील कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनही भरवण्यात आले. तसेच कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर यांच्या जीवनावर आणि त्यांच्या साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकणाऱ्या वर्तमानपत्रातील लेख, मुलाखतींच्या कात्रणांचा संग्रहही या प्रदर्शनात मांडण्यात आला.
या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र हुंजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आत्माराम नाटेकर यांनी केले.
मराठी भाषेच्या संवर्धनाचा हा उपक्रम रसिक व साहित्यप्रेमींसाठी आनंददायी ठरला.