मराठीत पहिला महिला प्रधान सस्पेन्स थ्रिलर ‘शातिर THE BEGINNING’ ९ मे २०२५ ला प्रदर्शित
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Mar 9
- 1 min read

9 March 2025
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिला प्रधान चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, महिला प्रधान सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांची उणीव जाणवत होती. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सने एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘शातिर THE BEGINNING’ असे या चित्रपटाचे नाव असून, यात अभिनेत्री रेश्मा वायकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाद्वारे त्यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे.
‘शातिर THE BEGINNING’ या चित्रपटाची कथा सुनील वायकर आणि हेमंत एदलाबादकर यांनी लिहिली असून पटकथा आणि दिग्दर्शन सुनील वायकर यांचे आहे. हा त्यांचा पहिलाच दिग्दर्शित चित्रपट आहे. रेश्मा वायकर यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटाच्या कथानकाविषयी रेश्मा वायकर म्हणाल्या, "माझ्या पहिल्याच चित्रपटात काहीतरी हटके आणि आव्हानात्मक भूमिका करायची होती. आज आपल्या समाजात अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत, त्याचा वापर करणाऱ्या तरुणाईचे प्रमाण वाढत आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरालाही याचा मोठा फटका बसला. अशा समाजविघातक प्रवृत्तीविरोधात लढणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईची कथा या चित्रपटातून मांडली आहे."
या चित्रपटात रेश्मा वायकर यांच्यासोबत मीर सरवर, योगेश सोमण, रमेश परदेशी, अनिल नगरकर, अभिमन्यू वायकर, वेद भालशंकर, श्रेया कुलकर्णी, गौरव रोकडे, निशांत सिंग आणि मनोज चौधरी यांसारखे अनुभवी कलाकार दिसणार आहेत.
संगीतकार रोहित नागभिडे यांनी चित्रपटाला संगीतबद्ध केले असून, गीतकार वैभव देशमुख यांच्या गीतांना प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि शाल्मली खोलगडे यांनी आवाज दिला आहे.
‘शातिर THE BEGINNING’ हा अॅक्शन आणि सस्पेन्सने भरलेला चित्रपट ९ मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. महिला प्रधान सस्पेन्स थ्रिलर चित्रपट म्हणून याची खास ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.