मानखुर्द, चुनाभट्टी, शेल कॉलनी, हिंदमाता परिसरात पावसाळी पाणी साचण्यावर उपाययोजना – अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Apr 18
- 2 min read

18 April 2025
मुंबई – आगामी पावसाळ्यात मानखुर्द, चुनाभट्टी, शेल कॉलनी, हिंदमाता आणि इतर सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचू नये यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध परिसरांत आज (१८ एप्रिल २०२५) पाहणी दौरा पार पडला.
पावसाळ्यातील जलनिकासी वेगाने होण्यासाठी नवीन पंप, जल साठवण टाक्या, फ्लो मीटर्स आणि आयओटी आधारित सेन्सर्स बसवण्यात येणार आहेत. यामुळे पंप सुरू आहेत की नाही, याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्रत्यक्ष वेळेत मिळणार आहे.
शेल कॉलनी परिसरासाठी विशेष उपाययोजना
चेंबूर येथील शेल कॉलनी परिसरात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. याठिकाणी दोन बंदिस्त नाले (ड्रेन्स) टेंभी पुलाकडून श्रमजीवी नाल्यात येऊन मिळतात. मात्र पावसात हे नाले काठोकाठ भरतात आणि पूरसदृश्य स्थिती निर्माण होते.

श्री. बांगर यांनी या भागात पुढील उपाययोजनांचे निर्देश दिले:
• रस्त्यालगतच्या मलवाहिनीत एक-दोन पंपांच्या माध्यमातून पावसाचे पाणी सोडण्यात यावे.
• स्वतंत्र वाहिनीद्वारे श्रमजीवी नाल्यात पाणी वळवावे. • श्रमजीवी नाल्यातील पाणी मागे येऊ नये, यासाठी पूर प्रतिबंधक व्यवस्था अधिक परिणामकारक बनवावी.
• या परिसरातील जलवाहिन्यांची रुंदी कमी असल्यामुळे त्यांची क्षमतावृद्धी करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून त्याची कार्यवाही लवकर करावी.
• यंदाच्या पावसाळ्यासाठी येथे अतिरिक्त पंप बसवण्याचे नियोजन.
• जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवली तर ती व्यवस्थीत हाताळता यावी यासाठी तत्काळ प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवावी.
प्रमुख इतर बाबी:
• चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात जलसाठवण टाकी व मिनी पंपिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन.
• मानखुर्द महाराष्ट्र नगर भूयारी मार्गातील पाणी साचण्याच्या समस्येवर सखोल उपाय.
• हिंदमाता साठवण टाकीवर फ्लो मीटर बसवून सातही पंपांची कार्यक्षमता एकसमान करण्याचा आदेश.
• डंकन नाला, सोमय्या नाला, श्रमजीवी नाला यांच्या वहन क्षमतेत वाढ करून प्रवाह सुलभ करणे.
• रेल्वे रूळाखालून पाईप टाकून उत्तरेकडील वस्त्यांतील पाणी दुसऱ्या नाल्यात वळवण्याचा विचार.
महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत सध्या विविध प्रकल्पांचे काम सुरू असून, पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे आदेश श्री. बांगर यांनी दिले आहेत.
महानगरपालिकेचा उद्देश यंदाच्या पावसाळ्यात पूरस्थिती टाळणे आणि नागरिकांचे जनजीवन सुरळीत ठेवणे आहे.