मुंबई महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय: खाजगी जागेवरील धोकादायक झाडांची छाटणी आता मोफत
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- May 29
- 1 min read

29 May 2025
मुंबई, पावसाळ्यात झाडे पडून होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे खाजगी जागेवरील अशा झाडांची छाटणी जी सार्वजनिक रस्त्यावर झुकत असून नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात, ती महापालिका आपल्या खर्चातून मोफत करणार आहे.

भाजपचे नेते व मंत्री श्री. आशिष शेलार यांनी या संदर्भात काल महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे मागणी केली होती. त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले की, सध्या खाजगी मालमत्तेवरील झाडांची छाटणीसाठी महापालिका संबंधित मालक किंवा सोसायटीकडून शुल्क आकारते. परंतु अनेकदा हे शुल्क भरले जात नाही आणि त्यामुळे छाटणी रखडते. परिणामी, झाडांच्या फांद्या कोसळून अपघात होण्याचा धोका वाढतो.

या मागणीची गंभीर दखल घेत आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करत एक परिपत्रक जारी केले आहे. या नव्या निर्णयानुसार, ज्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकल्या आहेत आणि संभाव्य धोका निर्माण करत आहेत, त्या झाडांची छाटणी महापालिका स्वतःच्या खर्चाने करेल – जरी ती झाडे खाजगी मालमत्तेवर असली तरी.
हा निर्णय सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत स्वागतार्ह असून, यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. नागरिकांनी देखील अशा धोकादायक झाडांची माहिती महापालिकेला वेळेवर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









