राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयागराज येथे महाकुंभस्नान शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतले शाही स्नान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे व्यवस्थेचे कौतुक
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Feb 24
- 1 min read

24 February 2025
प्रयागराज,उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पत्नी सौ. लता शिंदे यांच्यासह शाही स्नान केले. यावेळी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, दादा भुसे, भरत गोगावले आणि गुलाबराव पाटील यांनी देखील शाही स्नान करून धर्मकार्य केले.
See video
महाकुंभस्नानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "महाकुंभ हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचे केंद्र आहे. प्रयागराज ही गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नद्यांच्या संगमावर वसलेली पवित्र भूमी आहे. येथे स्नान केल्याने जीवनाचे सार्थक होते, अशी लोकांची श्रद्धा आहे." त्यांनी सांगितले की, "१४४ वर्षांनी होत असलेला हा महाकुंभ मेळावा अद्भुत आहे. कोट्यवधी लोक येथे आले, पण प्रत्येकाला समान वागणूक मिळाली. येथे कोणी मोठा किंवा लहान नाही. आतापर्यंत ६० कोटी भाविकांनी गंगा स्नान केले असून, हा एक जागतिक विक्रम आहे."
शिंदे यांनी उत्तरप्रदेश सरकारच्या व्यवस्थेचे भरभरून कौतुक केले. "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली महाकुंभाची भव्य आणि सुव्यवस्थित योजना करण्यात आली आहे. मागील दीड महिन्यापासून योगीजी आणि त्यांच्या टीमने अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक असूनही कोणतीही अडचण उद्भवली नाही," असे ते म्हणाले.
शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे देखील कौतुक केले. "पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्या मार्गदर्शनाखाली योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभाचे प्रभावी नियोजन केले. महाकुंभाची सकारात्मक ऊर्जा देशभर पोहोचेल आणि प्रत्येक घरात गंगेचे पवित्र जल जाईल. यामुळे देश आध्यात्मिक आणि आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करेल," असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
महाकुंभाच्या निमित्ताने देशातील विविध भागातून आलेल्या कोट्यवधी भाविकांनी गंगा स्नान केले. गंगेच्या पवित्र जलासह भक्तिमय वातावरणाने संपूर्ण प्रयागराज भारले गेले आहे. महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी देशभरातून कौतुक होत आहे.