top of page

वेव्हज २०२५ : भारताला कंटेंट सुपरपॉवर बनविण्याची ऐतिहासिक संधी!


मुंबई | 20 एप्रिल 2025 — जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रात मैलाचा दगड ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट समिट (WAVES 2025)’ ही बहुप्रतिक्षित परिषद अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. येत्या 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे होणारी ही समिट, भारताला ‘जागतिक कंटेंट हब’ बनविण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’ला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनानुसार, ही परिषद केवळ एक औपचारिक आयोजन नसून भारताच्या सर्जनशील शक्तीला जागतिक पातळीवर नेण्यासाठीचा मंच आहे. WAVES 2025 द्वारे भारताला ‘कंटेंट सुपरपॉवर’ म्हणून जागतिक मान्यता मिळवून देण्याचा निर्धार आहे.

मनोरंजन क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी WAVES 2025

FICCI-EY च्या अहवालानुसार, भारताचा मीडिया आणि मनोरंजन (M&E) उद्योग सध्या $28 अब्ज इतका असून, 2025 पर्यंत तो $34 अब्जपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. अशा वेळी WAVES 2025 हे व्यासपीठ भारतातील OTT, अ‍ॅनिमेशन, गेमिंग, VFX, चित्रपट, संगीत, आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील निर्मात्यांना जागतिक स्तरावर पोहोचवण्याची मोठी संधी ठरणार आहे.

भारत: सर्जनशील महासत्ता बनण्याच्या मार्गावर

भारतात दरवर्षी 2,000 पेक्षा अधिक चित्रपटांची निर्मिती होते आणि अनेक प्रादेशिक भाषांमध्ये कंटेंट तयार होतो. अमेरिकेसह युरोप, मिडल ईस्ट आणि दक्षिण आशियामध्ये भारतीय OTT कंटेंटला वाढती मागणी आहे. ही मागणी लक्षात घेता, WAVES 2025 भारतासाठी कंटेंट एक्स्पोर्ट हब बनण्याची दिशा निश्चित करणारे व्यासपीठ ठरणार आहे.

WAVES 2025 चे प्रमुख वैशिष्ट्ये:

  • ‘Create in India’ ला चालना – 'Make in India' नंतर आता 'Create in India' ही नवी संकल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न.

  • प्रादेशिक प्रतिभेला व्यासपीठ – भारतातील नवोदित निर्माते आणि कलाकारांना जागतिक प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्याची संधी.

  • ग्लोबल सहकार्य आणि गुंतवणूक – Netflix, Amazon, Disney+, Sony Pictures यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारीच्या संधी.

  • आधुनिक तंत्रज्ञानावर भर – AI, व्हर्च्युअल प्रोडक्शन, इंटरॅक्टिव कंटेंट यांवर चर्चा.

  • ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ – जगभरातील नवोदित क्रिएटर्ससाठी प्रतिभा सादर करण्याची संधी.

  • ‘वेव्हेक्स 2025’ – मीडिया-टेक स्टार्टअप्ससाठी नवकल्पना सादर करण्याचे मंच.

  • ‘वेव्हज मार्केट’ – कंटेंट निर्माते, गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र आणणारी जागतिक बाजारपेठ.

  • मास्टरक्लासेस आणि परस्पर संवाद – जागतिक स्तरावरील दिग्गजांशी थेट संवादाची संधी.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षीचे आयोजन

वेव्हज परिषदेचे दरवर्षी आयोजन केले जाणार असून यासाठी एक कायमस्वरूपी सचिवालय स्थापन केले जात आहे. ऑस्कर, कान्स, आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोस यांच्या धर्तीवर, वेव्हजला देखील जागतिक दर्जाचे वार्षिक आयोजन बनविण्याचा मानस आहे.

100 हून अधिक देशांचा सहभाग

या भव्य परिषदेत 100 पेक्षा अधिक देश सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राने या नव्या तंत्रज्ञान युगात आघाडी घेऊन क्रिएटिव्ह इकॉनॉमीला बळकटी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. WAVES 2025 च्या यशस्वी आयोजनातून मुंबईची ओळख ‘ग्लोबल क्रिएटिव्ह कॅपिटल’ म्हणून नक्कीच उजळेल.

bottom of page