सुषमा अंधारे यांचा नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Feb 24
- 1 min read

24 February 2025
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी आज नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केल्याची घोषणा केली आहे. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला शिवसेना पक्ष हा गोरगरिबांसाठी झटणारा आणि प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व देणारा आहे. नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक पक्षाच्या उज्ज्वल परंपरेवर आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक केली आहे. सत्ताधाऱ्यांना खुश करून राज्यसभा किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांनी हे बेताल वक्तव्य केल्याचे स्पष्ट आहे.”
अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंवर टीका करताना पुढे सांगितले, “वंदनीय बाळासाहेबांनी जोपासलेल्या परंपरेवर हा घाव आहे. लाखो शिवसैनिकांच्या संघर्षातून उभा राहिलेल्या पक्षावर चार वेळा आमदारकी भोगून देखील, नीलम गोऱ्हे यांनी स्वतःच्या भागात एक शाखा देखील उभी करू शकली नाहीत. अशा कर्तृत्वशून्य वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.”
या पार्श्वभूमीवर, सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करत असल्याचे जाहीर केले आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
- Mim Times