स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या "अनादी मी अनंत मी..." गीताला पहिला "छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत" पुरस्कार फ्रान्सच्या मार्सेलिस किनाऱ्यावरून मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Feb 25
- 2 min read

25 February 2025
मुंबई,छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षीपासून सुरू होणारा "महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार" स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या "अनादी मी अनंत मी..." या प्रेरणादायी गीताला देण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी फ्रान्समधील मार्सेलिस समुद्रकिनाऱ्यावरून केली.
या पुरस्काराच्या माध्यमातून दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे एका प्रेरणा गीताचा सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप 2 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे आहे. महाराष्ट्रभूषण व अन्य सन्मानांसारखाच हा पुरस्कार प्रेरणादायी गीतांना देण्यात येईल.
छत्रपती संभाजी महाराज हे उत्तम साहित्यिक व संस्कृतचे जाणकार होते. त्यांनी संस्कृतमधील 'बुधभूषण' ग्रंथ तसेच ब्रज भाषेत 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ग्रंथ रचले. त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या नावाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
See video
"कविता संघर्षाला बळ देते"
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, "माणसाच्या जीवनातील संघर्षात कविता आणि प्रेरणादायी गीत मनाला उभारी देतात. छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरित होऊन, महाराष्ट्र शासनाने प्रेरणा गीतांना गौरवण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतला."
सावरकरांचे 'अनादी मी अनंत मी...' गीताची निवड
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे "अनादी मी अनंत मी..." हे गीत त्यांच्या आत्मबलाचे प्रतीक मानले जाते. ८ जुलै १९१० रोजी मार्सेलिस बंदरावरून ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला, परंतु त्या क्षणी त्यांना प्रेरणा देणाऱ्या ओळी म्हणजे हे गीत. त्यांच्या देशभक्तीचा आणि अडचणींवर मात करण्याच्या वृत्तीचा हा प्रतीकात्मक सन्मान आहे.
पुरस्कार समितीची स्थापना
या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक, गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक, पु. ल. देशपांडे कला अकादमीचे संचालक आणि दर्शनिका विभागाचे संपादक यांचा समावेश आहे.
फ्रान्स दौऱ्यावर असलेल्या ॲड. आशिष शेलार यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे या गीताची निवड जाहीर केली. बैठकीला अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक संचालक विभीषण चवरे, चित्रनगरीच्या संचालक स्वाती म्हसे पाटील, पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आणि डॉ. बलसेकर आदी उपस्थित होते.
पुरस्कार लवकरच एका भव्य सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. कवी हयात नसल्यास, त्यांच्या कुटुंबीयांना किंवा त्यांच्या साहित्यिक वारशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेला हा सन्मान दिला जाईल, असेही जाहीर करण्यात आले.